उंब्रजजवळ अपघातात तीनजण जागीच; 22 जखमी
सातारा, 15 - मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज येथे आज (रविवार) सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बसची उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 22 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहलीला गेलेले विद्यार्थी खासगी बसने पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. तासवडे टोल नाक्याजवळ बस व उसाची ट्रकची धडक झाली. या अपघातात बाजूने बसचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात पुढील बाजूस बसलेले अभिजीत पंडीत पेठकर या विद्यार्थ्यासह शिवाई सुर्यकांत सुदाम कानडे आणि बसचा क्लिनर प्रकाश बसवराज बिराजदार या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.