Breaking News

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी : विभागीय आयुक्त डवले

  अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, छावण्यांची खरंच आवश्यकता आहे किंवा नाही, ते तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता असल्यास प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील टंचाईचा आराखडा झाला आहे. टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. टँकर सुरू करण्याआधी संबंधित गावात इतर उपाययोजना करणे शक्य आहे का? इंधन विहिरी अधिग्रहण केल्यास गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकेल का? त्याची माहिती घ्या, अशा सूचना संबंधित यंत्रणांना केल्या असल्याचे डवले म्हणाले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. मागील वर्षी 279 गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या गावांतील कामे येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुढील आर्थिक वर्षांसाठी 264 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांत लोकसहभागातून कामे सुरू करण्यात 
येणार आहेत. मात्र कर्जत, पारनेर आणि जामखेड तालुक्यातील गावांत अद्याप ही कामे सुरू झाली नाहीत. ती तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. याशिवाय महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने ही योजना करण्यात आल्याचे डवले यांनी सांगितले.