औरंगाबादमध्ये पाच दुकाने जळून खाक
औरंगाबाद, 15 - शहागंज भागातील जुन्या बस स्थानकालगतच्या पाच दुकानांना भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. दुकानांवरून गेलेल्या उच्चदाब (हायटेन्शन) तारांमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. आगीत 45 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जुन्या बस स्थानकाशेजारी अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक यांचे अजंठा बुक हाऊस आहे. त्यांच्या दुकानालगत मोसीन यांचे क्रॉकरीचे दुकान आहे. दुपारी सव्वादोनच्या सुमारास दुकानावरील हायटेन्शन तारा कोसळल्या, तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने आगीच्या ठिणग्या दुकानावर पडल्या. त्यातून आग वाढत गेली. अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानदारांनी दुकानांतून पळ काढला. दरम्यान, आगीचा भडका वाढत गेला. ही बाब समजताच नागरिकांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला. पंधरा ते वीस मिनिटांत आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवले.