शहीद शंकर शिंदेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई, 15 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपूत्र शंकर शिंदे अनंतात विलीन झाले आहेत. नाशिकमधील चांदवडच्या भयाळ गावात शंकर शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.
कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना नाशिकचे शंकर शिंदे आणि विजापूरचे सहदेव मोरे यांना वीरमरण आले. झुनरेशी गावात अतिरेक्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत नायक शंकर शिंदे आणि सहदेव मोरे यांना गोळी लागल्याने ते धारातीर्थी पडले. तर या चकमकीत भारतीय जवानांनी पाच अतिरेक्यांचा खात्मा केला होता. शंकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक नेते आणि अवघी पंचक्रोशी भयाळे गावात उपस्थित होती.सुमारे 1400 लोकसंख्या असलेल्या भयाळे गावातील 80 पेक्षा अधिक जवान सीमेवर देशाची सुरक्षा करत आहेत.
शहीद शंकर शिंदे हे चांदवड तालुक्यातील भयाळे गावचे आहेत. मागील 17 वर्षांपासून शंकर शिंदे सैन्यात होते. शंकर शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सुवर्णा, मुलगी (वय 6 वर्ष 5 महिने) मुलगा (वय 1 वर्ष 8 महिने) असे कुटुंब आहे. शिवसेनेने शहीद शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. शिवाय भयाळे या गावात शिंदे यांचे स्मारक बांधणार असून, राज्य सरकारही शहीद शिंदेंच्या कुटुंबीयांना भरघोस मदत करणार असल्याची माहिती सहकार राज्य मंत्री दादा भूसे यांनी दिली.