कृषी विक्रेत्यांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - केंद्र शासनाने भारतील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना किटक नाशक विक्री करण्याकरिता घातलेली पदवीधरची अट या अधिसुचनेविरोधात भारत बंदचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील सर्व खते - बियाणे, किटक नाशके विक्री दुकानदारांच्या संघटनांनी बंद पाळून शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मार्केटयार्ड, कोठी रोड मार्गे मोर्चा कलेक्टर कचेरीवर धडकला.
मोर्चेकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र फर्टिलाझर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कवडे, उपाध्यक्ष संजय बोरा, सुनिल मुनोत,ाजेश ढोळे, किशोर नवले, बापुसाहेब भवर, सुनिल चोरडिया, हनुमत सागडे, अजय बोरा, रमेश खिलारी संग्राम पवार आदींनी केले. या मोर्चात शहरासह तालुक्यातील सुमारे 80 विक्रेते सहभागी झाले होते.
महाराष्ट्र फर्टिलाझरस् पेस्टीसाईडस् सिड्स डिलर असोसिएशनच्या अहवानानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करत भारत बंदला पाठींबा दिला.केंद्र शासनाने किटक नाशके व खते विक्री करण्यासाठी परवान्याची मागणी करणार्या व परवाना धारक असणार्या व्यक्तीच्या शैक्षणिक अर्हतेविषयीची आधी सुचना रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. कृषी विक्रेत्यांच्या आंदोनलनाची दखल घेतली न गेल्यास पुढील काळात तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.