आंदोलनकर्त्यांकडून आयुक्तांना अश्लिल भाषेत शिवीगाळ
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - प्रशासकीय मंजूरीशिवाय प्रभागातील कामे सुरु करणार नाही, अशी भुमिका मनपा आयुक्त विलास ढगे, उपायुक्त बेहेरे यांनी घेतल्याने प्रभाग 1 मधील सेनेचे माजी नगरसेवक दिंगबर ढवण यांनी व नगरसेविका शारदा ढवण तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन केले.आयुक्तांकडून कोणतीच तडजोड होत नसल्याने दिंगबर ढवण आक्रमक झाले.
त्यांनी आयुक्त उपायुक्त यांच्यावर अश्लिल भाषेतील शिव्याचा वर्षाव केल्याने सेनेचे पदाधिकारी असलेले आंदोलक आवाक् झाले. यावेळी अनेकांनी दालनही सोडले. तब्बल 10 मिनिटे शिव्यांची लाखोळी सुरु होती.
महापालिकेच्या वतीने मुलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच प्रभागातील कामे पाठपुरावा करुनही होत नसल्याने सेना-भाजपच्यावतीने विशेषत: प्रभाग 1 मधील नगरसेविका व माजी नगरसेवक यांनी नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढला. सेनेच्या नगरसेवकांनी घोड्यावर बिर्हाडासह तर नगरसेवक तवले यांनी बैलगाडी मोर्चा काढला.
दिंगबर ढवण व प्रभागातील नागरिकांनी भिस्तबाग चौकातून पोतराज व वाद्य वाजवित मनपावर मोर्चा काढला.श्रीराम चौकातून प्रभागातील भाजपचे नगरसेवक तवले हे बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले. पायी मोर्चा मनपावर धडकला. मोर्चा येताच मनपातील कर्मचार्यांनी मनपाचे गेट बंद केले. मोर्चेकर्यांनी प्रवेशद्वाराची जाळी तोडून मुख्य गेटजवळ प्रवेश मिळविला. यावेळी घोषणा युध्द झाले. आंदोलनकर्ते गेटवर बाहेर बसले. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक ढवण, नगरसेविका शारदा ढवण, संभाजी कदम,संजय शेंडगे, तिवारी व इतर पदाधिकारी होते.घोड्यावर आणलेले बिर्हाड आयुक्त दालनात उतरवून घेण्यात आले. आयुक्तांशी वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, महापालिकेकडून प्रभागात मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. तसेच प्रभागातील कामे ठप्प झाले आहेत. पाण्यासाठी महिलांना भटकंतीची वेळ आली आहे. प्रभागात पथदिवे नसल्याने रात्रीच्या चोर्या वाढल्या आहेत. भयभीत जीवन जगावे लागत आहे. प्रभागातील कामांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही, मनपाने आश्वासन देऊनही कामे होत नाहीत, असे सांगितले. आयुक्तांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर ढवण हे आक्रमक झाले.त्यांनी शिवराळ भाषेत शिव्यांची लाखोळी सुरु केली.
दोन तास उलटूनही कोणताच तोडगा निघाला नाही, त्यानंतर आयुक्तांनी पुन्हा संभाजी कदम विक्रम राठोड, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दीपक खैरे, संपत नलवडे, नितीन शेलार, सुरेश तिवारी, योगिराज गाडे, सचिन शिंदे, प्रा.गाडे, संदेश कार्ले, आदींना पुन्हा चर्चेसाठी बोलविले. त्यानंतर आयुक्त ढगे यांनी मनपाकडे येणार्या विविध निधींची व खर्च झालेल्या निधींची माहिती दिली. त्यानंतर संभाजी कदम, सचिन जाधव, विशेष लेखाधिकारी (कॅफो) व आयुक्तांना धारेवर धरले.त्यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला. त्यानंतर आयुक्तांनी भिस्तबाग चौक ते तपोवन महालापर्यंतच्या रस्त्यासाठी 24 लाख तसेच प्रभाग 1 मधील 283 विजेचे खांब वगळता 81 खांबावर लाईट फिटींग, पथदिव्याचीं दुरुस्ती तसेच पुर्ण दाबाने पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश देऊन कामे तातडीने सुरु केली जातील असे सांगितले. त्यानंतर आंदोलनकर्ते थोडेसे शांत झाले. पदाधिकारी व प्रशासनात दुपारी 4 वाजेपर्यंत चर्चेचे गुर्हाळ सुरुच होते. प्रभागातील काम सुरु झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. अशी भुमिका ढवण यांनी घेतली. याच दरम्यान, आयुक्त दालनात बसलेल्या कार्यकर्त्यांनी बिर्हाडातील स्टोव्हवर तेथेच चहा केला. व स्वयंपाकही केला. दालनातील चहा आयुक्त ढगे, उपायुक्त बेहेरे व कार्यकर्त्यांना पाजला. यावेळी तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मोरे, हेकॉ.राजेंद्र गर्गे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
मनपावर आंदोलन करणार्या आंदोलकांनी अश्लिल भाषेत आयुक्त उपायुक्तांना अश्लिल शिवीगाळ करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. याबाबत प्रशासनाकडू तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. अधिकार्याकडून कारवाई होण्याची शक्यता चर्चेतून व्यक्त झाली.