प्राणी मित्राने दिले वटवाघुळला जीवनदान
पुणे (प्रतिनिधी)। 14 - येरवडा सेंट्रल जेल वसाहती समोरील लिंबाच्या झाडाखाली जखमी अवस्थेत पडलेल्या वटवाघुळला चर्होली येथील प्राणी मित्रांमुळे जीवनदान मिळाले. विक्रम नंदकुमार भोसले, संतोष काळजे असे वटवाघूळीला जीवनदान दिलेल्या प्राणी मित्रांचे नावे आहेत.
येरवडा सेंट्रल जेल समोरील लिंबाच्या झाडाखाली गेल्या तीन दिवंसापासून वटवाघूळ जखमी अवस्थेत पडला होता. आज (शनिवारी) प्राणीमित्र विक्रम भोसले यांना तेथील स्थानिक नागिरकांनी संपर्क साधला. त्यानंतर भोसले हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वटवाघुळच्या डोळ्यात मोठ्या प्रमाणात माती गेली होती. भोसले यांनी वटवाघुळच्या डोळ्यातील माती काढली.
त्यानंतर वटवाघुळला पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी वटवाघुळवर औषधोपचार केले. या मायेमुळे वटवाघूळ आजारपणातून थोडीशी सावरली. विक्रम हे गेली पाच वर्षापासून वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेमध्ये काम करतात. त्यांनी आजवर पुणे परिसरातील अनेक प्राण्यांना जीवनदान दिले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात प्राणी जखमी अवस्थेत आढल्यास प्राणीमित्र विक्रम भोसले 9689843326 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा.