‘सामाजिक बांधिलकीची जाणीव महत्वाची’ ः वासुदेव गाडे
पुणे (प्रतिनिधी)। 14 - सामाजिक बांधिलकी प्रत्येक तरुणाने जपली पाहिजे. उत्तम अधिकारी होण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेत उत्कृष्टरित्या यश मिळविण्यासाठी तुम्हाला समाजाच्या गरजा, अपेक्षा व समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला समाजाशी समरस होता आले पाहिजे. अशी भावना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी सातव्या स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलनाप्रसंगी व्यक्त केली.
सातव्या स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलन आजपासून पुण्यात सुरु झाले असून, या साहित्य संमेलनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी.पी. अग्रवाल, एमपीएससीचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू पं. विद्यासागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्यामसुंदर पाटील, सहावे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे, सातवे स्पर्धा परीक्षा संमेलानाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, या संमेलनाचे निमंत्रक डॉ. आनंद पाटील, समन्वयक संचालक वैशाली पाटील तसेच स्वागताध्यक्ष विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते.
सातव्या स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलानाच्या निमित्ताने आयोजित भव्यग्रंथदिंडी जोगेश्वरी मंदिरापासून ते टिळक स्मारक सभागृहापर्यंत काढण्यात आली. या दिंडीचे उद्घाटन साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. वारकरी संप्रदाय तसेच सोबत सहभागी झालेले कॉलेजमधील व स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी जयघोषात हरिनामाचा ताल धरून ही दिंडी उत्साहात निघाली. या दिंडीत पारंपारिक वेशातील विद्यार्थी ,युवक आणि फुगड्या घालणारे वारकरी व विद्यार्थिनी हे लक्षवेधी ठरले.
यावेळी, युपीएससी एमपीएससीच्या जागा मर्यादित आहेत परंतु त्यासाठी परीक्षेमध्ये सहभागी होणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहेत. म्हणूनच अपयश जरी पदरी पडले तरी खचून न जाता इतर क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याकडेदेखील लक्ष केंद्रित करता येऊ शकते. म्हणूनच आपण आपल्या आयुष्याचे प्राधान्यक्रम वेळेत ठरविता आला पाहिजे. असे देखील मार्गदर्शन वासुदेव गाडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
पं. विद्यासागर म्हणाले की, मेंदू हा माणसाचा महत्वाचा टूल आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याच हातात असते. त्यामुळे आपण काय आत्मसात करतो तसेच ते कसे वापरतो हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये असते. परीक्षा देतानासुद्धा तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमले पाहिजे. प्रश्न नीट समजून घेऊन ते सोडविता आले पाहिजे. आपले व्यक्तिमत्व इतरांपेक्षा कसे वेगळे आहे हे या स्पर्धा परीक्षांमधून समजून येते. त्यासाठी निश्चितच तयारी करावी लागते. या स्पर्धांमुळे व्यक्तिमत्वाची जडण घडण होते. स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमधून उमेदवाराचे व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो त्यामुळे फक्त लेखी परीक्षा महत्वाची नसून त्याची मुलाखतदेखील तितकेच आवश्यक आहे असे मत सातव्या संमेलानाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी मांडले.
स्पर्धापरीक्षा क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या मान्यवरांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला. सोलापूरचे प्राध्यापक हांडगे आणि नागपूरमधील स्टडी सर्कलची धुरा सांभाळत असलेले सुनील कुदळे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.