Breaking News

धीरेंद्र हिरालाल वाघेला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

मुंबई, दि. 15 - न्यायाधीश धीरेंद्र हिरालाल वाघेला यांना दरबार हॉल, राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारोहात राज्यपाल विद्यासागर राव यांनी पदाची शपथ दिली.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी न्या. वाघेला यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींनी जारी केलेली अधिसूचना वाचून दाखविल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली.  मुंबई येथे बदलीवर येण्यापूर्वी न्या. वाघेला ओरिसा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर कार्यरत होते. मुंबई उच्च न्यायालचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शाह यांचा कार्यकाल 8 सप्टेंबर रोजी संपल्यानंतर न्या. विजया कापसे ताहीलरामाणी या मुख्य न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होत्या.  शपथविधी समारोहाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, महाधिवक्ता श्रीहरी अणे, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एस आर बन्नूरमठ, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 न्या. वाघेला यांचा जन्म 11 ऑगस्ट 1954 रोजी राजकोट येथे झाला. त्यांनी राजकोट येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी ही पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. सन 1976-77 साली त्यांनी एलएलएम ही पदवी प्राप्त केली. न्या. वाघेला यांनी 1978 साली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली व श्रम तसेच औद्योगिक न्यायालयात काम केले.