तिरस्काराची कडवट चव चाखूनही महान कार्य करणारे नेते म्हणजे ज्योतीबा व डॉ. आंबेडकर ः पत्राळे
तळेगाव (प्रतिनिधी)। 08 - तिरस्काराची कडवट चव ज्याच्या वाट्याला येते त्यालाच त्या दुःखाची तीव्रता कळू शकते. असे असतानाही समाजाच्या उन्नतीसाठी ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी सातत्याने प्रयत्न केले, असे मत भारत भारतीचे राष्ट्रीय संयोजक विनय पत्राळे यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने आयोजित अॅड. दादासाहेब परांजपे व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
संस्थेच्या कै. सौ. क्षमा अरविंद शहा सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन थुल, संस्थेच्या अध्यक्षा विनया केसकर, चिटणीस अशोक संभुस उपस्थित होते. बाबासाहेबांची 125 वी जयंती व महात्मा फुले यांची 125 वी पुण्यतिथी यानिमित्त या दोन महान नेत्यांचे स्मरण करण्यात आले.
पत्राळे पुढे म्हणाले, “जी जात नाही ती जात, या विधानाचा प्रत्यय आपण आजही घेतोय. जात निर्मूलनाचे काम करत असताना प्रत्येक ठिकाणी जातीचा उल्लेख करावा लागतो. समाजाने या नेत्यांच्या विचारांना पुढे नेले पाहिजे. ज्योतीबा, भीमराव, डॉ. हेडगेवार, सावरकर या नेत्यांनी आपल्या विचारांप्रमाणे जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
अविनाश भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. विनया केसकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद ओव्हाळ व पांडुरंग गायकवाड यांच्या बुध्दवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रंथपाल विनया अत्रे, उपग्रंथपाल मानसी गुळुमकर, सहाय्यक ललिता गटणे, रेखा उजनीकर व जान्हवी देशमुख यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.