26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच : डेव्हिड हेडली
मुंबई, 08 - 26/11चा गुन्हेगार आणि या खटल्यात माफीचा साक्षीदार बनलेल्या डेव्हिड हेडलीची मुंबईच्या विशेष मकोका कोर्टात साक्ष नोंदवली जाते आहे. अमेरिकेतील एका तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही साक्ष सुरु आहे. यावेळी न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित आहेत.
महत्वाचं म्हणजे लष्कर-ए-तोयबाच्या ज्या साजिद मीरने त्याला भारतात पाठवले होते. तो साजिद मीर आयएसआयचा हँडलर म्हणून काम करत होता, असेही डेव्हिडने म्हटले आहे.
डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीदरम्यान पाकिस्तानमध्ये मोकाट फिरणारा 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचं नावही घेतलं आहे. हल्ल्यासंदर्भात सर्व आदेश हाफिज साईद देत असे, असे हेडली म्हणाला. शिवाय, हाफिज सईदच्या आदेशावरुन लष्कर-ए-तोयबाची सर्व काम करत होतो, अशी कबुलीही हेडलीने दिली आहे. हेडलीनं कोर्टात साजिद मीरचा फोटो ओळखला. साजिद मीर आणि हेडली वेगवेगळ्या इमेल आयडीच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. ‘सप्टेंबर 2008 मध्ये मुंबईवर हल्ला करण्यासाठी 10 दहशतवाद्यांचा एका गट मुंबईकडे रवाना झाला होता. मात्र, समुद्रात जहाजाला ठोकरल लागली आणि प्लॅन फिस्कटला. या अपघातात शस्त्रांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्येही असाच एक प्लॅन झाला. मात्र, तोही अयशस्वी झाला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मुंबई हल्ल्याचा प्लॅन यशस्वी झाला., असे हेडलीन साक्षीत सांगितले.
सप्टेंबर 2008मध्ये मुंबईत हल्ल्यासाठी निघालेली एक बोट समुद्रात खडकावर आदळून नष्ट झाली. त्यावरील लोक लाईफजॅकेटच्या मदतीने पोहत किनार्यावर गेली. त्या बोटीवरील सर्व सामान दारूगोळा, अॅम्युनेशन समुद्रात बुडाला. ही बोट कराचीच्या जवळील समुद्रकिनार्याच्या जवळून निघाली होती आणि बुडाल्यावर सर्व लोक पोहत कराचीत परतले. त्यानंतर महिनाभराने, ऑक्टोबरमधे त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. जोही निष्फळ ठरला. त्यानंतरचा मात्र नोव्हेंबरमध्ये मुंबईवरील हल्ला यशस्वी झाला.मूळ पाकिस्तानी वंशाचा असलेला डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेतल्या एका तुरुंगात बंद आहे. डेव्हिडनेच 26/11 हल्ल्याआधी मुंबईतल्या विविध ठिकाणांची चित्रफित बनवून ती लष्कर-ए-तोयबाला पाठवली होती. हल्ल्याआधी तो सातवेळा मुंबईत येऊन गेला होता.