Breaking News

शिवसेनेकडून पुण्यात हेल्मेटची अंतयात्रा ; पिंपरीत समर्थन

 पुणे (प्रतिनिधी)। 08 - राज्य सरकारच्या हेल्मेट सक्तीविरोधात सामान्य नागरिकांचा विरोध समजण्यासारखा होता. आता मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या वतीने आज (रविवार) पुण्यातील कोंढवा येथे हेल्मेटची अंतयात्रा काढून राज्य सरकारला घरचा आहेर दिला. 
दरम्यान, निगडी येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट परिधान करून आंदोलन करीत हेल्मेट वापरणे गरजेचे असल्याचे सांगत हेल्मेट सक्तीचे  समर्थन केले. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या निर्णयावर शिवसेनेतच एक मत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात हेल्मेटसक्तीला जोरदार विरोध करण्यात येत आहे. आधी रस्ते चांगले करा, असे म्हणत शिवसैनिकांनी हेल्मेट सक्तीला जोरदार विरोध दर्शविला. काल शनिवारी (दि.6) भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसेनेही हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला होता. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटची अंत्ययात्रा काढून या सक्तीचा निषेध नोंदविण्यात आला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हेल्मेट सक्ती करू नये, यासाठी पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.
दुसरीकडे निगडी येथे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हेल्मेट परिधान करून आंदोलन करीत हेल्मेट सक्तीचे जोरदार समर्थन केले. तसेच आधी जनजागृती करावी. त्यानंतरच हेल्मेट सक्ती करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले.
परिवहन मंत्री दिवाकर रावते हे न्यायालयाच्या आदेशाचे सरकार पालन करत असल्याचे सांगत आहेत. राज्यातील युती सरकार मधील समन्वयाचा अभाव जाणवत असून, दिवाकर रावते ज्या पक्षाचे आहेत. 
त्या शिवसेनेतच परस्पर विरोधी मत असल्याचे स्पष्ट झाले आहे.