मांगी-तुंगीच्या विकासासाठी सर्व सहकार्य
नाशिक/प्रतिनिधी। 15 - मांगी-तुंगीची ओळख एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जगभर व्हावी यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल,असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्ती आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्यांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, श्याम जाजू, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. सुभाष भामरे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, दीपिका चव्हाण, राजेंद्र पटणी, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, श्री ज्ञानमती माताजी, श्री रवींद्रकीर्ति स्वामी, श्री चंदनामती माताजी, स्वागताध्यक्ष जे. के. जैन, सुरेश जैन, दादा जाधव, भूषण कासलीवाल, वर्धामन पांडे, संजय पापडीवाल, जीवनप्रकाश जैन आदी उपस्थित होते.
श्री. शाह म्हणाले, भारताची निर्मिती भूसांस्कृतिक देशाच्या रुपात झाली आहे. जगात अशा स्वरुपाचा आपला एकमात्र देश आहे. त्यामुळे संस्कृतीचे संवर्धन आवश्यक आहे. जगातील अनेक मत आणि विचारधारा मागे पडल्या. मात्र देशाच्या संस्कृतीने नेहमी जगाला मार्गदर्शन केले. आक्रमकांना शरण न जाता विद्वान आणि पंडीतांसमोर नम्र व्हायला शिकवणारी आपली संस्कृती आहे. देशातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिकधारांनी जगाला आपल्याकडे आकर्षित केले. भारतीय संस्कृती समाजाचे कल्याण शिकविणारी आहे, असे त्यांनी सांगितले. मांगीतुंगी येथे 108 फुटाची भगवान ऋषभदेवांची मूर्ती ज्ञानमती माताजींच्या इच्छाशक्तीमुळे निर्माण करणे शक्य झाल्याचे सांगून ते म्हणाले, आपल्या देशातली जीवन पद्धती जीवनकल्याणाचे मार्गदर्शन करणारी आहे. योगसाधना तिचा मुलभूत आधार आहे. त्यामुळे देशातील आध्यात्मिक विकासाला महत्व देताना समाजातील मुलभूत समस्या दूर करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात येतो.
खासदार भामरे यांनी मांगीतुंगीचा पर्यटनक्षेत्र म्हणून चांगला विकास करणे शक्य असून ऐतिहासिकदृष्ट्या या क्षेत्राला व साल्हेर-मुल्हेर परिसराला महत्व असल्याचे सांगितले. ज्ञानमतीजी यांनी भगवान ऋषभदेव यांची प्रतिमा केवळ जैन धर्माची ओळख न होता देशाची ओळख होईल, असा विश्वास व्यक्त केला. महामस्तकाभिषेक सोहळ्यात येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी शासन-प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. 108 फूटी मूर्ती देशाचा वारसा ठरेल, असेही त्या म्हणाल्या. रविंद्र कीर्ति स्वामींनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महामस्तकाभिषेक सोहळा यशस्वी करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगून शासन व प्रशासनाला धन्यवाद दिले. प्रशासनाच्या चांगल्या सहकार्यामुळे भाविकांना चांगल्या दर्जाच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचे सांगितले. जे. के. जैन यांनी शासनाचे सहकार्य ऐतिहासिक आहे असे नमूद करून राज्य शासनाने केलेल्या सहकार्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले. श्री.शाह यांच्या हस्ते मांगीतुंगी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आचार्य अनेकांत सागरजी, देवनंदीजी,गुप्तिनंदीजी, देवसेनजी, पद्मनंदीजी, धर्मसेनजी, धर्मनंदीजी, तीर्थनंदीजी, बालाचार्यदेवसेनजी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी हेलिकॉप्टरमधून भगवान ऋषभदेव मूर्तीस्थळाची पाहणी केली.
प्रशासनातर्फे चोख व्यवस्था
जिल्हा प्रशासनातर्फे सोहळ्याला येणार्या भाविकांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाने चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. आरोग्य विभागातर्फे ठिकठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून वाहनतळापासून सभास्थानापर्यंत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. तात्पुरते आतीदक्षता कक्ष उभे करण्यात आले आहे. गरजेनुसार रूग्णाना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. आय पाण्याच्या सुविधेसाठी हरणबारी येथून पाईपलाईनने पाणी आणण्यात आले आहे. मोबाईल सुविधा अखंडितपणे सुरू राहवी यासाठी अतिरिक्त टॉवर बसविण्यात आले आहेत. आयोजकांनी आणि भाविकांकडून शासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपत्ती निवारण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आला आहे.