वाहतूकीसाठी बोगदा खुला करण्यासाठी ‘आप’ चे आंदोलन
नाशिक/प्रतिनिधी। 15 - इंदिरानगर येथील उड्डाणपुलाखालील बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या बोगद्यावर निनावी फलक लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
आम पार्टीने नाशिकचा नवीन नियम जिथे ट्रॅफिक जाम तिथे रस्ता बंद, इंदिरानगर बोगद्यासारखे! राणेनगर, लेखानगर बोगदे बंद करावेत, असे फलक घेऊन उभे राहिले होते. या उपरोधात्मक फलकाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. इंदिरानगर येथील बोगदा पोलीस प्रशासनाने अकरा महिन्यांपूर्वी अचानक बंद केला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने करून प्रशासनाला यासंबंधी निवेदनेही दिली होती. मात्र जनतेच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथे शनिवारी सकाळी आम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी उपरोधिक फलक हातात घेऊन प्रशासनाच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या फलकाच्या माध्यमातून परिसरातील जनतेवर होणारा अन्याय दूर करावा; अन्यथा राणेनगर व लेखानगर येथील बोगद्यात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता दोघेही बोगदे इंदिरानगरचा बोगदा बंद केला तसाच बंद करावा, अशी उपरोधिक मागणी करण्यात आली आहे. उपरोधात्मक फलक लावूनही पोलीस प्रशासन जागे होत नसल्याने आगामी महापालिका निवडणुकीत बोगदा चांगलाच भोवणार असल्याचे चित्र दिसत आहे.