Breaking News

सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मनपा कर्मचार्‍यांचे दुसर्‍या दिवशीही आंदोलन

 अहमदनगर । प्रतिनिधी । 13 -   स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वोच्च पदावरअसलेल्या आयुक्त विलास ढगे यांना शिवीगाळ झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी कामकाज बंद ठेवले.शुक्रवारीही कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच होते. यामुळे मनपाची संपुर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. आयुक्त व मनपा कर्मचारी संघटनेचे प्रमुख यांची महापौरांच्या कार्यालयात चर्चा सुरु होती.
 खुद्द आयुक्त सुरक्षित नाहीत तेथे कर्मचार्‍यांचे काय? असा सवाल करीत सुरक्षेसाठी प्रतिबंध करा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली. आयुक्तांना शिवीगाळ करणारे सेनेचे शहर उपप्रमुख दिगंबर ढवण यांचाही निषेध करण्यात आला. महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर यांच्या पुढाकारातून महापालिकेत कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. प्रभागातील विकास कामांना निधी मिळत नसल्याने नगरसेविका शारदा ढवण व त्यांचे पती सेनेचे शहर उपप्रमुख दिगंबर ढवण यांनी आयुक्तांच्या दालनात बैठा सत्याग्रह केला. या आंदोलना दरम्यान ढवण यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली होती. ढवण यांचा निषेध करताना संघटनेने कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आणला. महापालिकेत कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची कोणतीच उपाययोजना केलेली नाही. आयुक्त, उपायुक्त व महापौर यांनी यासंदर्भात चर्चा करून सुरक्षेचे उपाय योजावेत. त्याची दिशा ठरवावी. स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने शहराच्या आमदारांनीही त्यात प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय सुचवावेत, अशी मागणी लोखंडे यांनी केली.