बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी ः रसाळ
अहमदनगर । प्रतिनिधी । 15 - बारावीनंतर कला, वाणिज्य व शास्त्र शाखेबरोबरच कला, जाहिरात, अॅनिमेशन, माध्यम भाषा क्षेत्रांत करिअरच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शिल्पा रसाळ-जोशी यांनी केले.
समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सावेडीतील समर्थ विद्या मंदिर प्रशालेत इ. 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजिण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रसाळ बोलत होत्या. व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष भा. ल. जोशी, सचिव प्र. स. ओहोळ, शाळा समितीचे अध्यक्ष अॅड. किशोर देशपांडे व प्राचार्या संध्या कुलकर्णी उपस्थित होत्या. रसाळ म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नेहमीच्या रुळलेल्या वाटांपेक्षा निराळी वाट निवडावी. उत्तम चित्रकार, शिल्पकार, नृत्यांगना, गायक म्हणूनही करिअर करता येते. मात्र, त्यासाठी साधना, उपासना आणि चिकाटी गरजेची असते. कोणतेही क्षेत्र निवडले तरी सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी सातत्य परिश्रम, मेहनतीची आवश्यकता असते.
12वी नंतर तुम्ही कॉलेज विश्वात तरुणाईत प्रवेश करणार आहात. त्यामुळे आता स्वप्न सत्यात उतरविण्याचे तुमचे दिवस आहेत. शाळा संपली म्हणजे तुमचे शैशन, बालपण, कुमारावस्था संपली. आता तुम्ही तारुण्यात प्रवेश करणार आहात. त्यामुळे नव्या आव्हानांना तुम्ही बेधडक सामोरे जा. तारुण्यात जिगर, जोश असतो. तुमच्यातील उर्जेचा विधायकतेसाठी उपयोग करा.
यावेळी अॅड. देशपांडे व ओहोळ यांचे भाषण झाले. पाहुण्यांचा परिचय मकरंद खरवंडीकर यांनी करून दिला. सौ. संध्या कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक प्रतिनिधी प्रा. कोतकर व विद्यार्थ्यांच्या वतीने राजश्री थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. शुभदा कुलकर्णी यांनी केले.