Breaking News

देशद्रोही विद्यार्थ्यांना गोळ्या घाला- खा. साक्षी महाराज

 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 16 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजप खासदार साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान करून या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘जेएनयू’त राष्ट्रविरोधी घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे मत साक्षी महाराज यांनी व्यक्त केल्यामुळे आणखी वाद उफाळण्याची शक्यता आहे.  
‘जेएनय’तील देशद्रोह्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवण्यापेक्षा त्यांना फासावर लटकवा नाहीतर पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जात असल्याचे मी याआधीपासूनच म्हणत आलो आहे. त्यानंतर अनेक दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती. आता हा दहशतवाद ‘जेएनय’सारख्या जागतिक स्तरावरील महाविद्यालयात देखील पोहोचला आहे. देशाचा अपमान कोणत्याही प्रकारे सहन केला जाऊ शकत नाही. सीताराम येचुरींसारखे नेते अशा विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन गलिच्छ राजकारण करत आहेत, असे साक्षी महाराज म्हणाले. 9 फेब्रुवारी रोजी जेएनयूत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरून विद्यापीठातील डाव्या विचार्‍यांच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारसह अन्य सात जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कन्हैया कुमार याच्या भाषणाचा जो पुरावा दिला जात आहे,त्याची सत्यता शोधण्यासाठी न्यायिक चौकशीचे आदेश केजरीवाल यांनी द्यावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. केजरीवाल यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा आणि संयुक्त जनता दलाचे खासदार के. सी. त्यागी हे होते.