कुभांर समाजाच्या स्माशनभूमीच्या जागेची परस्परविक्री
अर्धापूर/प्रतिनिधी । 16 - शहरातील कुंभार समाजाची स्मशानभुमी वहिवाटी प्रमाणे ज्या शासकीय गायराण गटक्रमांक 548 मध्ये होती या गटातील काही पट्टेधारकांनी महसूल प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून गायराणाच्या पट्ट्याच्या शासकीय जमीनीची नोंद ग्रामपंचायतीच्या मालकी हक्क दर्शविणार्या नमुना क्रमांक आठच्या अभिलेखात काही पट्टेधारकांनी केली आहे. या मालकी हक्काद्वारे महसूल प्रशासनाला अंधारात ठेवून विक्रीचे व्यवहार होऊन टोले जंग इमारत उभ्या झाल्या आहेत.
ज्या पट्टेधारकांनी महसूल प्रशासनाची परवानगी न घेता खरेदी विक्रीचे व्यवहार केले होते अशा पट्टधारकांविरुद्ध शासनाच्या विहीत शर्ती व अटींचा भंग केल्यामुळे सर्व व्यवहार रद्द करून पट्टेधारकांकडून जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मापलवार यांनी अर्धापूर तहसीलदारांना 2006 मध्ये आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे जमीन शासनाच्या नावे कागदोपत्री झाली पण खरेदी विक्रीचे व्यवहार मात्र सुरुच राहिले. कुंभार समाजाच्या स्मशानभूमीच्या वादा विषयी तहसील कार्यालयात सुनावणी झाली असून समाजाच्या कार्यकर्त्यांनी वहिवाटी प्रमाणे ज्या शासकीय जागेत स्मशानभूमी होती त्याच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर ज्यांनी प्लॉट खरेदी केला आहे. अशांनी विक्री खताची प्रत सादर केली. पण या खरेदीच्या व्यवहारात जिल्हाधिकार्यांच्या परवानगी संबंधी कोणतेच प्रमाणपत्र नव्हते.शासनाची फसवणूक करून ग्रामपंचायत अभिलेखात नोंद करून खरेदी विक्रीचे व्यवहार करणार्यांवर व तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर फसवणुकीच गुन्हा दाखल करण्यात यावा व शासकीय जमीनीची महसूल प्रशासनाची परवानगी न घेता झालेले सर्व बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्याची मागणी होत आहे. शहरातील 548 या शासकीय गायराण गटामध्ये सुमारे 35 एकर क्षेत्र आहे. यात तळे, बाजार, पट्टेधारकांचा समावेश आहे. ज्यांना पट्टे करून दिले आहेत त्या पैकी काहिंनी खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत. जेव्हा भोगवटाधारक क्रमांक होत असते तेव्हा खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी जिल्हाधिकार्यांचे परवानगी घ्यावी लागते अशीच परवानगी काही पट्टेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती.
याबाबत सुनावणी होऊन पट्टेधारकांनी जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 53 (1) अशींचा भंग केल्यामुळे जमीन परत घेण्याचे आदेश दिले ज्याप्रमाणे काही पट्टेधारकांचे पट्टे रद्द झाले या 548 गटक्रमांकात पट्टेधारकांनी सविक्रीचे व्यवहार केले आहेत असे सर्व बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी तहसीलदार सतीश सोनी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की कुंभार समाजाच्या वहीवाटी प्रमाणे असलेल्या स्मशान भूमीच्या जागेविषयी सुनावणी झाली आहे. या संबंधी नगर पंचायतीला आपले म्हणणे सांगण्याविषयी सुचना देण्यात आल्या आहेत.