Breaking News

शिवसेना ‘खरोखरंच’ कुठे आहे?


मुंबई, प्रतिनिधी, दि. 14 -  मेक इन इंडियाचा सोहळा मुंबईत होत असताना शिवसेना कुठे आहे? असे तिरकस प्रश्‍न विचारून नसत्या उठाठेवी करू नका. जिथे जिथे मुंबई-महाराष्ट्राच्या विकासाचा विषय असतो तिथे शिवसेनेला आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडत शिवसेनेने ‘मेक इन इंडिया’पासून दूर राहिल्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, केंद्र, राज्य ते अगदी मुंबई महापालिकेतही भाजपसोबत एकत्र सत्तेत असलेली शिवसेना ‘मेक इन इंडिया’चा सोहळा मुंबईत होत असताना खरोखरचं कुठे आहे?असा सवाल विचारला जात आहे.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहातंर्गत आजपासून मुंबईत ‘मेक इन मुंबई’ या सोहळ्याचे राज्य सरकारने आयोजन केले आहे. मात्र, या कार्यक्रमावर भाजपचेच एकछत्री अंमल दिसत आहे. शिवसेनेचेच सुभाष देसाई खुद्द उद्योगमंत्री असतानाही त्यांचे अस्तित्त्व दिसून येत नाही. आपल्या पक्षनेत्याला फारसे स्थान नसल्याने देसाईं जातीने उपस्थित असले तरी ते केवळ देखाव्यासाठीच असल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसल्याने थेट पंतप्रधानांच्या व्यासपीठावर बसवता येणार नाही त्यामुळे भाजपने त्यांना मोदींच्या उपस्थितीत होणार्‍या उद्घाटनाला न बोलावता थेट समारोपाचे प्रमुख पाहुणे बनवले आहे. त्यामुळे शिवसेना मेक इन इंडिया कार्यक्रमात कुठे आहे असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. मुंबई-महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत व औद्योगिक शांततेत शिवसेनेचे मोठे योगदान आहे. मुंबईच्या छाताडावर औद्योगिक प्रगतीचे अनेक सोहळे गेल्या 50 वर्षांत पार पाडले, पण मुंबईला तिचे हक्क मिळविण्यासाठी सदैव झगडावेच लागले. 
मुख्यमंत्री गलेलठ्ठ शिष्टमंडळ घेऊन परदेशी दौरे करीत होते. या 
परदेश दौर्‍यातून नक्की किती दमड्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली? परदेश दौर्यांचा खर्च निघावा इतकीही गुंतवणूक आली नाही. त्यामुळे मेक इन इंडियात सहभागी होणारे 60 देश व पाच हजार प्रतिनिधी महाराष्ट्राला काय देऊन जाणार आहेत? हा प्रश्‍न आहेच. आम्ही स्वत: विकासाच्या व आधुनिक प्रगतीच्या बाजूचे आहोत. 
त्यामुळे मेक इन इंडियाचे स्वागत महाराष्ट्रात करीत आहोत, पण विकासामुळे ज्यांच्या पोटावर मारले जाणार आहे त्यांचे शापही घेऊ नका, कारण वर्षभरात फक्त विदर्भातच 1328 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यात एकाच महिन्यात 89 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही दुसरी बाजू मेक इन इंडियाचीच आहे व शेतकर्‍यांच्या आयुष्याला आधार देणारा मेक इन महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे.