Breaking News

शेतीमध्ये महिलेचा नवा प्रयोग; 150 कुटुंबांत सोन्याचे दिवस

मुंबई, प्रतिनिधी, दि. 14 -  भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील महिलेने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोकणी माणसाची उडी भातशेतीच्या पलीकडे नसल्याचा समज खोडून काढण्याचे 
काम केले आहे. प्रयोगशीलतेतून हळदीच्या पिकाने शिवार फुलवतानाच मिलन राणे यांनी आपल्यासह दीडशेवर महिला व आदिवासी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम केले आहे. 
पावसाच्या लहरीपणामुळे कोकणातील भातशेती अडचणीत आली. जमिनीचे मालकही पोटापाण्यासाठी शहरात जात आहेत. अशा वेळी पेण तालुक्यातील खारपलेच्या मिलन राणे यांनी हळदीसारख्या नगदी पिकाचा प्रयोग करून आदर्श निर्माण केला आहे. भाताला पाणी जास्त झाले तर पीक कुजते, कमी झाले तर करपते. अशा वेळी वेगळे करण्याच्या उद्देशाने मिलन यांनी हळद लागवडीचा निर्णय घेतला. यावर अनेकांनी नाके मुरडली. स्वत:ची शेती नसल्याने परिचिताच्या दोन एकर पडीक जमिनीवर मिलन यांनी हळद लावली. शेतीसाठी त्यांना टेकडी ओलांडून दुसर्‍या गावात जावे लागायचे. सकाळी 8 ते रात्री 8 हा वेळ शेतात जायचा. सुरुवातीला 5  किलो बेण्यातून 50 किलो हळद त्यांनी काढली. भातानंतर 9 महिन्यांनी हे पीक येते. राज्य सरकारच्या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनातून त्यांना मुंबईत बाजारपेठ मिळाली. दर्जेदार उत्पादनाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो हे पाहून त्यांनी 500 टन, 5000 हजार टन करत गतवर्षी मिलन यांनी 25 हजार टन हळदीचे उत्पादन घेतले. पुढे हळद पावडर तयार करून विक्रीचा मार्ग त्यांनी शोधला. दरवर्षी  हजार टन हळद पीक आणि सहा टन हळद पावडरचे उत्पादन त्या काढत आहेत.
आदिवासींसह इतरांना प्रेरित करून मार्गदर्शन व्यवसाय विस्तारत असतानाच मिलन 2007 मध्ये बचत गटात सहभागी झाल्या. 11 सदस्य महिलांना त्यांनी हळद उत्पादन घेण्यास प्रेरित केले. सध्या 21 बचत गटांतील  159 महिला हळद उत्पादन घेत आहेत. खारपलेजवळील  5 ते 6 पाड्यांवर जाऊन मिलन यांनी पडीक जमिनीत हळद लागवडीचे तंत्र आदिवासींना शिकवले. एवढेच नाही तर महागडी खते न वापरता नैसर्गिक खते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले. यामुळे पाड्यांवरील 50 जण हळद लागवड करत आहेत. ही हळद मिलन याच खरेदी करतात. सूरण, आळूचे कांदे, कणक, करांदे अशा कँदमुळांच्या उत्पादनाचे शिक्षण देऊन आदिवासींना त्यांनी जोडधंदा मिळवून दिला.