Breaking News

शिवडीत फ्लेमिंगो पाहण्याची शेवटची संधी?

मुंबई, प्रतिनिधी, दि. 14 -  शिवडी धक्क्याजवळ फ्लेमिंगो पाहण्याची यंदा अखेरची संधी असू शकते, असे आवाहन स्वयंसेवी संस्था करत आहेत. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे काम या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे. परिणामी फ्लेमिंगोंचा हा तळ कदाचित पुढच्या वर्षी येथे नसेल. 
शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंकचे काम ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली आहे. पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यापूर्वी मातीचे नमुने, पाणथळ जमिनीची स्थिती स्पष्ट करणे अत्यावश्यक असल्याने पुलाचे खांब जिथे असतील तेथील खोली पाहण्यासाठी किंवा माती, खडकांचे नमुने घेण्यासाठी ड्रिलिंगचे काम एक-दोन महिन्यांत सुरू होणार आहे. परिणामी, प्रदूषण व बांधकामाच्या यंत्रसामग्रीच्या कर्णकर्कश आवाजांमुळे फ्लेमिंगोंची समाधी भंग होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यावेळी फ्लेमिंगो येथून दूर जाण्याची शक्यता पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि सॅक्च्युअरी एशिया या संस्थांनी फ्लेमिंगो फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पक्षीप्रेमींना केले आहे. फ्लेमिंगोंव्यतिरिक्त स्थानिक व स्थलांतरित बगळे, पाणकावळा, शराटी, कुरव, सुरय, चिखल्या, तुतारी व धीवर यांच्यासारख्या विविध प्रजाती 
पाहण्याची संधीही फ्लेमिंगो फेस्टिव्हलच्या निमित्ताने मिळते. 
जनजागृतीसाठी स्पर्धा 
सॅक्च्युअरी एशिया नियतकालिकाचा फ्लेमिंगो फेस्टिव्हल या नियतकालिकाचे वाचक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 21 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 8.30 पर्यंत होणार आहे. बीएनएचएसचा फ्लेमिंगो फेस्टिव्हल 5 मार्चला आहे. हा फेस्टव्हल मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मदतीने बीएनएचएस घेते. तो सर्वांसाठी निःशुल्क आहे. शिवडी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडून दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत निःशुल्क बसही सोडण्यात येणार आहेत. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही बीएनएचएस घेणार आहे. बीएनएचएस कन्झर्व्हेशन एज्युकेशन सेंटरने (सीईसी) याविषयीची आखणी केली आहे. वेगवेगळ्या वयोगटांसाठी असलेल्या या स्पर्धांची सविस्तर माहिती बीएनएचएसच्या फेसबुक पेजवर फेस्टिव्हलच्या एक आठवडा आधी देण्यात येईल. चित्रकला, काव्यलेखन व घोषवाक्य या ऑफलाईन स्पर्धांसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवायच्या आहेत.