सकारात्मक विचाराने केलेले संस्कार जीवनभर ऊर्जा देतात ः चंचला कोद्रे
पुणे (प्रतिनिधी)। 15 - पुणे (प्रतिनिधी) ः मुळापासून संस्कार झाले तर सुसंस्कारीत समाज घडेल. भूमाता ज्याप्रमाणे सर्व आघात पोटात घेऊन जीवसृष्टीला प्रेरणादायी ऊर्जा देते त्याप्रमाणेच मातेने सकारात्मक विचाराने गर्भावर केलेले संस्कार जीवनभर ऊर्जा देतात. असे प्रतिपादन पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांनी नवी सांगवी येथे केले. तनुश्री गर्भसंस्कार केंद्राच्या चौथ्या मोफत कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर डॉ. सुधा कांकरीया, डॉ. सुभाष रानडे, तृप्ती देसाई, रवीबाला काकतकर, ब्रम्हाकुमारी संस्थेच्या संजीवनी दिदी, गिरीषभाई, संजय चोरडिया, डॉ. शुभदाणी नील, वैष्णवी पटवर्धन आदी उपस्थित होते. यावेळी ‘माँ तुजे सलाम’ या कार्यक्रमामध्ये डॉ. मिनाक्षी मोरे, डॉ. शारदा सुराणा, विमल बराटे, उषाताई कराड, शुभांगी दामले, प्रतिभा हिंगे, जयश्री वैद्य, अरुनिता साही, सुषमा चोरडिया, मंगला कडमुले आणि भारती पटवर्धन या मातांचा गौरव करण्यात आला.
चंचला कोद्रे पुढे म्हणाल्या की, गर्भसंस्काराबरोबरच येणार्या पिढीला आगामी संकटांचा धिरोदत्तपणे सामना करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, जीजाबाई यांचा इतिहास सांगा. कष्टकरी, गरीब, दुष्काळी ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबपध्दतीमध्ये ज्येष्ठांचा सन्मान राखला जातो. तर आर्थिक संपन्न शहरी विभक्त कुटुंबपध्दतीमध्ये आई वडीलांना वृध्दाश्रमात देह त्याग करावा लागतो. भावना व प्रेमळ नाती जपण्याचे बिज पुढच्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी ‘गर्भ संस्कार’ आवश्यक आहे. सुशिक्षित व सदन कुटुंबातील मातांनी येथून प्रेरणा घेऊन आपल्या परिसरातील झोपडपट्टीमध्ये ज्ञानाचा तेजोमय प्रकाश पोहचविल्यास गरीब व श्रीमंतातील दरी दूर होईल. असेही कोद्रे म्हणाल्या. डॉ. सुधा कांकरीया यांनी स्त्री भ्रुणहत्येबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उपस्थितांबरोबर प्रतिज्ञा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, पंजाब, राजस्थान, गुजरात राज्यात मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे मुलींच्या पित्याला पैसे देऊन लग्न केली जातात. 21 व्या शतकातील विकासाची स्वप्न बघणार्या भारतातील हरियाणा राज्यात आजही महाभारताप्रमाणे एका मुलीचे लग्न पाच-पाच पुरुषांशी लावण्याची प्रथा अस्तित्वात आहे. ही शरमेची बाब आहे. असेही कांकरीया म्हणाल्या.