ब्लॅकमेल करणार्यास खंडणी पथकाकडून अटक
पुणे (प्रतिनिधी)। 15 - सीसीटीव्ही फुटेज, तसेच राजकीय नेत्यांना त्यांच्या विरूद्ध माहितीचे फुटेज माझ्याकडे आहे, असे सांगून त्यांना खंडणीची मागणी करणारर्या तरूणास खंडणी विरोधी पथकाने आज (रविवारी) कात्रज सर्पोद्यानाबाहेर अटक केली आहे. गणेश बाळू कोळेकर (वय वर्ष 27, राहणार स्वप्ननगरी, चाकण), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश बाळू कोळेकर (वय वर्ष 27, राहणार स्वप्ननगरी, चाकण), असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उद्योजक मोतीलाल भन्साळी (रा. सोपानबाग घोरपडी, पुणे) यांना गणेश कोळेकर याने मोबाईल फोन करून तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी मिळाली असून ज्याने सुपारी दिली त्याचे नाव व सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यासाठी 25 लाख द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारीन, अशी धमकी त्याने दिली होती. त्यामुळे या विरुद्ध भन्साळी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भन्साळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यासंबंधी तपास करित असताना पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाला या तरूणाने यापूर्वीही पैशासाठी खेड तालुक्यातील माजी आमदारांच्या नातेवाईकांना व नाशिक येथील आमदारांच्या सहकार्याला विरोधी आमदार, खासदारांच्या माहितीचे फुटेज देतो, असे सांगून पैशाची मागणी केली होती, असे आढळले. तसेच मनी लाँड्रींगच्या नावाने फेक अकाऊंट उघडून त्याद्वारे कर्ज देण्याचे आमिषही त्याने दाखवले होते. त्याबाबतही अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सी.एच.वाकडे, पोलीस उपायुक्त पी. आर.पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व निलेश देसाई, सचिन अहिवाळे, प्रशांत पवार, सिद्धार्थ लोखंडे, प्रमोद मगर, धिरज भोर, रमेश गरूड यांच्या पथकाने केली.