अनुशेषावर वेगळा विदर्भ हाच पर्यायः खांदेवाले
बुलडाणा । 15 - संयुक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भ सहभागी झाला. परंतू स्वातंत्र्यानंतर विदर्भाच्या वाट्याला अनुशेष आला. विदर्भामध्ये सर्वकाही साधन संपत्ती उपलब्ध असतांना विदर्भाची दयनिय अवस्था वाढली आहे. विदर्भाचे मागासलेपण दुर करण्यासाठी वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत अॅड.मिरज खांदेवाले यांनी व्यक्त केले.
स्थानिक महाराष्ट्र पर्यटन संकुलावर 12 फेब्रुवारी रोजी आयोजित विदर्भ राज्य निर्मिती जनजागरण कार्यक्रमात अँड.मिरज खांदेवाले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेश मापारी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून न.प.चे गटनेते शांतिलाल गुगलीया, अँड.स्वप्निल संन्याल, पंढरी चाटे, अँड.हाडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी अँड. खांदेवाले म्हणाले की, विदर्भात जवळपास 35 हजार शेतकर्यांनी सिंचनाच्या अभावामुळे आपली जीवनयात्रा संपविली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त नद्या विदर्भात असूनही विदर्भात सिंचनाची बोंबाबोंब आहे. 60 वर्षात विदर्भात सिंचन व्यवस्थेचा विकास झाला असता, तर पांढरं सोनं पिकविणार्या विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नसता. राज्यात विद्युत उत्पादनापैकी 65 टक्के वीज एकट्या विदर्भात तयार होते. यासाठी विदर्भात 25 पॉवर प्लँट असून, आणखी 100 पॉवर प्लँट विदर्भातील गॅस चेंबरमध्ये ढकलायचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे. मोठय प्रमाणात विद्युत उत्पादन होऊनही विदर्भाच्या वाट्याला केवळ 15 टक्के वीज मिळते. उर्वरित वीज मुंबई, पुणेकडे वळती करण्यात आली आहे. 60 वर्षात राजकीय पुढार्यांनी विदर्भाची अवस्था ’सातार्याला लुटून पुण्याला दान करायचे’ अशीच करून ठेवली आहे. विदर्भातील शेतीची उत्पादकता कमी आणि शेतकरी गरीब आहे, असे नाही. तर त्याला पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याने 55 वर्षात गरीब ठेवले आहे. यामुळे विदर्भातील जनतेपुढे, येथून दोन पर्याय आहेत.
एकतर विदर्भ राज्य न मागता सर्व प्रकारचे शोषण सहन करत रहायचे, वीज पळवू द्या, शेतकर्यांना मरू द्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुढार्यांकडून अपमान सहन करत रहा. नाही तर स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसपक्षाच्या अणे समित्यांनी शिफारस केल्याप्रमाणे विदर्भाच्या स्वतंत्र राज्याचा आग्रह धरा. आपल्या भावी पिढय बर्बाद होण्यापासून वाचविण्याच्या दृष्टीने आजच्या पिढीने स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा सातत्याने सुरू ठेवण्याची गरज आहे.
यावेळी अँड.हाडे यांनी उपस्थित मान्यवरांच्या डोक्यात ’जय विदर्भ’च्या टोप्या घालून स्वतंत्र विदर्भ चळवळीला बळ मिळवून दिले, तसेच अँड.संन्याल यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झाल्यास होणार्या फायद्यांची माहिती सांगितली. विदर्भ वेगळा झाला की, विदर्भातील नागरिकांना 1500 मॅगावॅट वीज 2 रुपये 50 पैसे युनिट प्रमाणे मिळेल. सध्या हीच वीज आठ रुपये युनिट प्रमाणे मिळत आहे. आपण वापरलेली वीज नंतर शिल्लक राहणारी वीज इतर राज्याला जादा दराने विकता येणार आहे. यामुळे विदर्भात स्वस्त दराने विद्युत निर्माण होऊन मुंबई, पुणे येथील औद्योगिक कंपन्या विदर्भाकडे वळतील. यातून विदर्भातील बेरोजगार तरूणांना चांगल्या वेतनावर रोजगार मिळेल. विदर्भ राज्याची निर्मिती झाल्यास पहिल्याच वर्षी राज्याला 100 कोटी रुपयांचे उत्पन्न होणार असल्यासचेही अँड.संन्याल यांनी सांगितले.