Breaking News

मांगी-तुंगीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास

नाशिक/प्रतिनिधी। 13-  भगवान ऋषभदेव यांची 108 फुट उंचीची आणि एकाच दगडात कोरलेली जगातील एकमेव मूर्ती देशाचा सांस्कृतिक ठेवा ठरेल आणि  मांगी-तुंगी तिर्थक्षेत्र चांगले पर्यटन स्थळ  म्हणून विकसीत होईल, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
बागलाण तालुक्यातील मांगी-तुंगी  येथे 108 फुट उंच भगवान ऋषभदेव प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिपीका चव्हाण, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, श्री ज्ञानमती माताजी,    श्री रवींद्र कीर्ति स्वामी, स्वागताध्यक्ष जे. के. जैन, महोत्सव समितीचे भुषण कासलीवाल महाराज, डॉ. पन्नालाल पापडीवाल,  श्रीजीवन प्रकाशजी, प्रमोद कासलीवाल, संजय पापडीवाल आदी उपस्थित होते.  श्री. बागडे म्हणाले, ऋषभदेवाच्या विशालकाय मूर्तीचे काम  आश्‍चर्यकारक  आहे. मूर्तीमुळे मांगी-तुंगीचे नाव जगाच्या नकाशावर पोहचले आहे. नाशिक जिल्ह्यात विविध तिर्थक्षेत्र आहेत. त्यात मांगी तुंगीच्या ऋषभदेवाची भर पडली आहे. पयर्टन क्षेत्र व तिर्थक्षेत्र म्हणून  या भागाच्या विकासाला चालना मिळेल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.  मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे, तसेच अवयव दानाबाबत समाजात जनजागृती झाली पाहिजे, असेही श्री. बागडे यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. भामरे यांनी सोहळ्याच्या उत्तम नियोजनाचा उल्लेख करून मांगी-तुंगीचा तिर्थक्षेत्र म्हणून वेगाने विकास होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.  रविंद्र किर्तीजी महाराज यांनी  सोहळ्यासाठी शासन  व प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाल्याचे नमूद केले.
तत्पूर्वी सकाळी  7-00 वाजेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास मंत्रोच्चाराच्या घोषणेत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी आचार्य, समाजबांधव, भाविक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.