Breaking News

हॉटेल उद्योगाची उभारणी आता अधिक सुलभ

मुंबई, प्रतिनिधी, दि. 02 - गतिमान औद्योगिक विकासासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेस या मोहिमेला गती देण्यासाठी हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगासाठी घ्यावयाच्या गृह विभागाशी संबंधित पाच परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. 
या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगाला चालना मिळणार आहे.  राज्यातील उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस या मोहिमेअंतर्गत सरकारी परवानग्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी करण्यात सरकारला यश आले आहे. यापूर्वी उद्योग, नगरविकास, पर्यावरण आदी विभागांच्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. या मोहिमेला गृह विभागाकडूनही आता पाठबळ मिळाले आहे.