सर्वसामान्यांच्या मदतीने इसिस विरुद्ध लढणार -मुंबई पोलिस आयुक्त पडसलगीकर
मुंबई, प्रतिनिधी, दि. 02 - बदलत्या काळाबरोबर गुन्ह्याचे स्वरूप जरी बदलले असले, तरीही अनुभवाच्या आधारे हे आव्हान आपण स्वीकारू, असा विश्वास व्यक्त करत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला आपण सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचा मनोदय व्यक्त करतानाच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसच्याविरोधात लढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असल्याने तब्बल 17 वर्षे राज्याच्या पोलिस दलाबाहेर राहिल्यानंतर पुन्हा आपल्या केडरमध्ये परतलेले दत्ता पडसलगीकर हे प्रामाणिक आणि सचोटीचे पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी मावळते पोलिस आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी भविष्यातील आपल्या कामाच्या रुपरेषेविषयी माहिती दिली. मुंबईत काहीही घडले तरी त्याचे परिणाम जगभर होतात. त्यामुळे मुंबईत काम करणे हे कायम आव्हानात्मक असते. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या महानगराच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देणार असून वृद्ध, लहान मुले आणि महिलांसंबंधी गुन्हे रोखण्यावर आपला विशेष भर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम राहण्यासाठी कर्मचार्यांचे मनोबल वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.