जिल्ह्यातील 96 अपघातग्रस्त विद्यार्थी अनुदानापासून वंचित
अहमदनगर । प्रतिनिधी । अहमदनगर । प्रतिनिधी । 02 - इयत्ता पहिली ते बारावी या शैक्षणिक कालावधीत अपघाती मृत व अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षापुर्वी शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेच्या अनुदानाअभावी जिल्ह्यातील 96 विद्यार्थी अद्याप वंचित आहेत.
शैक्षणिक वर्ष 9 जुलै 2014 ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान, अपघातग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जमा करुन मंजूर करण्यात आले. मात्र, विविध कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांचे पालक अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. एकूण 96 प्रलंबित प्रस्तावांमध्ये 93 मृत तर 3 जण अपंग आहेत. मृत झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाच्या नावे 7 हजार व कायमचे अपंगत्व आल्यास 30 हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे मिळणार आहे. यासाठी या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासोबत एफआयआर, स्थळ पंचनामा, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रति स्वाक्षरीत केले मृत्यू दाखला आदींसह विविध आवश्यक कागदपत्रे जोडण्यात येऊनही राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेच्या अनुदानाअभावी प्रतिक्षेत असणार्या मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना अनुदानाची प्रतिक्षा करावी लागत आहे ऑगस्ट 2014 ते सप्टेंबर 2015 या दरम्यान, 50 प्रस्ताव मंजूर झाले असून 37 लाख 50 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. आता 96 जणांसाठी 70 लाख 65 हजार रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी प्राथमिक
शिक्षण संचालयानाकडे निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
या योजनेच्या सहभागाबद्दल अनेक विद्यार्थ्यांना व कॉलेज प्रशासनामध्ये जागृती झालेली नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याची नोंद फक्त एखाद्या पोलिस ठाण्यात अकस्मात म्हणून केली जाते. मात्र, संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकाला पोलिस ठाण्याकडून कोणतीही माहिती वेळेवर उपलब्ध करुन दिली जात नाही. वारंवार मागणी करुनही आवश्यक ती कागदपत्र न मिळाल्याने अनेक जण या अनुदानाचा नादही सोडून देतात. या योजनेबाबत महाविद्यालय, शाळा व पोलिस स्टेशन या ठिकाणी जागृती करण्याची गरज असल्याचे चर्चेतून पुढे आले आहे.