Breaking News

इशरत जहाँ ‘लष्कर-ए-तोयबाची हस्तक : डेव्हिड हेडलीची धक्कादायक कबुली




मुंबई/प्रतिनिधी,दि. 11 -  इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक आणि सुसाईड बॉम्बर होती अशी धक्कादाक कबुली दिली आहे.मुंबईवरील भीषण हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला डेव्हिड हेडलीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई न्यायालयासमोर गुरूवारी साक्ष दिली. इशरत जहाँ ही लष्करची दहशतवादी आणि महिला विंगेची सुसाईड बॉम्बर होती. कोणत्या तरी एका नाक्यावर पोलिसांना मारण्याचा कट होता, त्यात ती सामील होती. तेच गुजरातमधील अक्षरधाम मंदिर उडवणे आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्याची जबाबदारीही तिला देण्यात आली होती’ असे महत्त्वपूर्ण खुलासे हेडलीने केले आहेत.
लष्कर-ए-तोयबाची सदस्या असल्याच्या कारणावरून गुजरात पोलिसांनी मुंब्राची रहिवासी असलेल्या 19 वर्षीय इशरत जहाँ हिला 2004 साली झालेल्या चकमकीत ठार केले होते. तिच्यासोबत आणखी तिघांनाही दहशतवादी असल्याच्या संशयावरून ठार करण्यात आले होते. या चकमकीवरून देशभरात गदारोळ माजला होता, मात्र आज हेडलीने केलेल्या खुलाशानंतर इशरत जहाँ दहशतवादी असल्याच्या आरोपावर एकाप्रकारे शिक्कामोर्तबच झाले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या साक्षीमध्ये मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा व आयएसआयने पैसा पुरविल्याचा खुलासा हेडलीने केला आहे. मुंबईला येण्याआधी मला मेजर इक्बाल, साजिद मीर आणि तहव्वूर राणा यांच्याकडून बरेच पैसे मिळाले होते. तसेच 26/11 हल्ल्यापूर्वी तहव्वूर राणा भारतात आला होता. पण तो अडचणीत सापडू नये म्हणून मीच त्याला अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला होता’ असेही हेडलीने कबूल केले.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधीची माहिती हेडली व्हिडिओ कॉन्फरन्सने विशेष न्यायालयाला देत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि लष्करी साहाय्य करीत असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारच्या सुनावणीदरम्यान हेडलीने न्यायालयाला दिली होती. विशेष न्यायालयाने 10 डिसेंबर 2015 रोजी हेडलीला माफीचा साक्षीदार केले आणि 8 फेब्रुवारी रोजी साक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 8 फेब्रुवारीपासून हेडलीची साक्ष नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली.