Breaking News

लान्सनायक हनुमंतअप्पा कोप्पड शहीद


नवी दिल्ली, दि. 11 - सियाचिनमध्ये झालेल्या हिमपातात अडकलेल्या जवानांपैकी आश्‍चर्यकारकरीत्या बचावलेले जवान हनुमंतप्पा कोप्पड गुरुवारी अखेर उपचारादरम्यान हुतात्मा झाले. लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून कोमात असलेल्या हनुमंतअप्पा यांची प्रकृती ढासळतच गेली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती.
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ 19,600 फूट उंचीवरील लष्करी चौकीवर 2 फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे 10 जवान बर्फाखाली गाडले गेले होते. हे सर्व जवान शहीद झाल्याची भीती लष्कराने वर्तवली होती. हाडे गोठवणार्‍या थंडीत अतिशय प्रतिकूल वातावरण असताना लष्कराच्या शोधपथकाने सहा दिवसांपासून रात्रंदिवस अथक शोधमोहीम चालवली असता सोमवारी रात्री उशीरा बर्फ कापल्यानंतर त्या पथकाला हनुमंतअप्पांच्या हालचाली आढळून आल्या. त्यांना लगेच एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गुरूवारी सकाळी हनुमंतअप्पा यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि सकाळी पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दरम्यान लान्सनायक हनुमंतअप्पा कोपड यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शहा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.