Breaking News

‘मेक इन इंडिया’ मुळे भारत व स्वीडनचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील ः स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन

 पुणे (प्रतिनिधी)। 15 - भारत सरकारने हाती घेतलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडन सरकार भरीव योगदान देत असून यामुळे भारत व स्वीडनमधील परस्पर सहकार्यात वाढ होण्याबरोबरच दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, असा विश्‍वास स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन यांनी आज येथे व्यक्त केला.
दोन दिवसांच्या भारत भेटीवर आलेले स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन यांनी आज चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमधील टेट्रापॅक आणि एरिकसन या कंपन्यांना भेट दिली. त्यादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना बोलत ते होते. स्वीडनचे भारतातील राजदूत हॅराल्ड सॅण्डबर्ग, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यासाठीच्या स्वीडनच्या वाणिज्य दूत फ्रेडरिका ऑर्नब्रन्ट, स्वीडीश चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि टेट्रापॅक कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक कन्दर्प सिंग यादी याप्रसंगी उपस्थित होते.
भारत सरकारने हाती घेतलेल्या 
‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये सहभागी व्हायला स्वीडनला अतिशय आनंद वाटत आहे, असे सांगून पंतप्रधान श्री. लोव्हेन पुढे म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत उद्योगांना सहजतेने व कमीत कमी वेळात परवाने व इतर बाबी उपलब्ध होण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत भारत सरकारने उचललेली पावले अत्यंत स्वागतार्ह आहेत. नाविण्यपूर्ण उद्योग, व्यवसायांची स्थापना व नवीन कल्पनांना बळ देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने भारताचा गतीने व शाश्‍वत विकास होण्यास मदत होईल. या विकासामध्ये स्वीडनकडून भरीव योगदान दिले जाईल. 
लोव्हेन पुढे म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, ‘मेक फॉर इंडिया’ या बरोबरच ‘ग्रीन इंडिया’ या तीन बाबींसाठी स्वीडन सरकार भारताला मोठे सहकार्य करणार आहे. भारतामध्ये स्वीडनच्या अनेक कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. यामुळे मोठी आर्थिक गुंतवणूक येथे होईल. टेट्रापॅक कंपनीचा चाकण येथील प्रकल्प स्वीडनबाहेरील सर्वात मोठा प्रकल्प आहे. येथे निर्माण होणार्‍या पॅकींग साधनांच्या सहाय्याने दूध आणि इतर अन्नपदार्थ भारतासारख्या मोठया देशातील दूर्गम भागातील जनतेपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचून एक प्रकारे समाजाला उपयुक्त काम होत आहे.
भारताच्या डिजिटल इंडिया या मोहिमेमध्ये एरिकसन कंपनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्‍वास व्यक्त करुन पंतप्रधान श्री. लोव्हेन म्हणाले की, भारतामधील एरिकसनच्या प्रकल्पात सर्वाधिक 22 हजार कामगारांना रोजगार दिला आहे. यावरुन भारताचे स्वीडनला असलेले महत्व अधोरेखित होते. एरिकसन कंपनी डिजिटल इंडिया मोहिमेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्‍वासही श्री. लोव्हेन यांनी यावेळी व्यक्त केला.
टेट्रापॅक कंपनीतील भेटीप्रसंगी स्वीडनचे पंतप्रधान श्री. लोव्हेन यांनी कंपनीच्या उत्पादन प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची पहाणी केली. एरिकसन कंपनीतील भेटीप्रसंगी श्री. लोव्हेन यांनी कोनशिलेचे अनावरण केले. तसेच कंपनीच्या प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती एरिकसनचे हेड ऑफ रिजन (भारत) पावलो कोलेला यांच्याकडून घेतली. यावेळी एरिकसनचे भारत विभागाचे अध्यक्ष मॅट्स ओल्सनही उपस्थित होते.