Breaking News

कॉ.अनंत लोखंडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत साथी किशोर पवार पुरस्कार प्रदान

 अहमदनगर । प्रतिनिधी ।  अहमदनगर । प्रतिनिधी । 02 - उद्योग क्षेत्रात कंत्राटी कामगार नेमण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. यातून उत्पादनांचा दर्जा घसरत असून निर्यातही कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादक गुणवत्ता वाढविण्यासाठी मालकांनी कामगारांना उत्पादनाच्या प्रमाणात वेतन देणे गरजेचे असल्याचे मत कॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. 
राष्ट्र सेवा दल व एस. एम. जोशी फौंडेशनच्यावतीने दिला जाणारा साथी किशोर पवार कार्यकर्ता पुरस्कार कॉ. अनंत लोखंडे यांना शनिवारी प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित ’कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल’या विषयावर परिसंवादात अभ्यंकर बोलत होते. यावेळी अँड. सुरेखा दळवी, अँड. राम शरमाळे, सुभाष वारे, दिलीप जाधव, शिवाजी नाईकवाडी, मधु पाटील आदी उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, उद्योगक्षेत्रात मालकांनी कामगारांचे हित जपणे गरजेचे आहे. उत्पादनात दर्जा नसेल तर निर्यात कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे परकीय चलन कमी होते. ही बाब एकूणच अर्थव्यवस्थेला घातक आहे, असे ते म्हणाले. यावेळी अँड. सुरेखा दळवी यांनी सध्याचे सरकार कामगार संघटना मोडीत काढण्याचे धोरण अवलंबित असल्याचे सांगितले. अँड. शरमाळे यांनी व्यवस्थापनाविरोधातील लढयात कामगारांची होणारी फरफट विषद करत कंत्राटी पद्धतीला सरकार गती देत असल्याचे सांगितले. यावेळी लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.