प्राधिकरणाच्या घरकुल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध
पिंपरी (प्रतिनिधी)। 09 - वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 व 32 मध्ये प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणार्या नियोजित घरकुल प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढला आहे. या प्रकल्पाच्या गुरूवारी (दि. 11) होणार्या भूमीपूजनासाठी उभारण्यात आलेला मंडप नागरिकांनी सोमवारी (दि. 8) उखडून टाकला. वाल्हेकरवाडी आणि चिंचवडेनगर भागात सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षण नसल्याने नियोजित घरकुल प्रकल्पाऐवजी या जागेत शाळा, रुग्णालय, मैदान, उद्यान या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे केली आहे. तसेच प्रधिकरणाला केवळ निविदेतच रस असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 व 32 मध्ये घरकुल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 2016-17 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी प्राधिकरणाने गुरूवारी (दि. 11) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते भूमीपूजन करण्याचे नियोजन आहे. परंतु, वाल्हेकरवाडी आणि चिंचवडेनगर येथील नागरिकांचा या नियोजित घरकुल प्रकल्पाला विरोध आहे. वाल्हेकरवाडी आणि चिंचवडेनगर भागात सुमारे 50 हजारहून अधिक लोकसंख्या आहे. परंतु, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी या भागात सार्वजनिक प्रयोजनाचे कोणतेही आरक्षण नसल्याचा येथील नागरिकांचा दावा आहे.
त्यामुळे या भागात ना कोणतेही मोठे रुग्णालय आहे, ना उद्यान आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, मोकळे मैदान, शाळा, व्यायामशाळा यांपैकी कोणतीच सुविधा या भागात उपलब्ध नाही. त्यामुळे या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत निविदेत रस असलेल्या प्राधिकरणामार्फत याठिकाणी घरकुल प्रकल्प राबविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे गुरुवारी करण्यात येणार्या प्रकल्पाच्या भूमीपूजनाला नागरिकांनी विरोध केला आहे. भूमीपूजन कार्यक्रमासाठी प्राधिकरणाने मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे. येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी जाऊन मंडप उभारणीला विरोध केला. आधी नागरिकांना सुविधा पुरवा, त्यानंतरच घरकुल प्रकल्प राबवा, अशी येथील नागरिकांनी मागणी केली. तसेच माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, भाजपचे नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, दिलीप गडदे, बिभीषण चौधरी, राजेंद्र चिंचवडे, संतोष आहेर आदींनी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप सोमवारी उखडून टाकला. वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 व 32 मध्ये घरकुल प्रकल्प होऊ नये, या मागणीचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांना
निवेदन देण्यात आले आहे. येथील नागरिकांना सुविधा पुरविल्यानंतरच घरकुल प्रकल्पाचा विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, नागरिकांच्या मागणीचा विचार न करता घरकुल प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा घाट घातल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेखर चिंचवडे यांनी दिला आहे.