सरकारबद्दल स्वाभिमानी नेत्यांची नाराजी
तासगांव ः दि. 15 - स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत असली तरी त्यांना डावलून घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांवर त्यांची असणारी नाराजी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे आयोजित दुष्काळी पाणी परिषदेत दिसून आली. यावेळी खासदार राजू शेट्टी, रा.स.प. चे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर या सर्वांनीच भाजपाच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले.
या दुष्काळी परिषदेत स्वाभिमानीची भूमिका नेमकी काय असणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपासोबत युती केल्याने पस्तावल्याची भावनाही या नेत्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. ज्या शेतकर्यांच्या हितासाठी आम्ही तुम्हांला सत्तेत येण्यास मदत केली. नेमका तो उद्देश बाजूला ठेवून भाजपचे सत्ताकारण चालू असल्याची टीका या परिषदेत स्पष्टपणे करण्यात आली. हे सरकार जर शेतकर्यांच्या हितासाठी नसेल तर आम्ही या सरकारविरोधात देखील लढू, असा खणखणीत इशारा देत राजू शेट्टी यांनी आठ दिवसात म्हैसाळ पाणी योजना सुरु करण्याचा अल्टीमेटम सरकारला दिला. आठ दिवसात म्हैसाळ सुरु न झाल्याचा म्हैसाळ लाभक्षेत्रात चक्काजाम करण्याचाही इशारा त्यांनी दिला. म्हैसाळ योजना सुरु व्हावी म्हणून फक्त पाच कोटींचे वीज बिल या सरकारला भरावयाचे होत नाही. सरकार एवढे कंगाल झाले आहे कां?आता इशारा देण्याची वेळ संपली आहे, या राज्यकर्त्यांना आता गुडघे टेकायला लावूच. आपण असे सामर्थ्य तयार करायला हवे. देशात एवढे मोठे घोटाळे सुरु आहेत. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. या घोटाळेबाजांना पकडल्यास म्हैसाळसारख्या दहा योजना राबविता येतील, असेही शेवटी म्हणाले.
सरकारने काही दिवसांपूर्वी कोणताही काही दिवसांपूर्वी कोणताही गाजावाजा न करता देशातील उद्योगपतींचे 1 लाख 14 हजार कोटींचे कर्ज माफ केले आणि शेतकर्यांचे किरकोळ कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसा नसल्याचा कांगावा करतात. हे आता चालू देणार नाही. शेतकर्यांना पूर्वानुभवावरुन हे माहित आहे, की आपण बिलरुपाने भरलेला पैसा सरकारच्या तिजोरीपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ते पैसे भरत नाहीत. शेतकर्याने बिल भरले नाही म्हणून जर तुम्ही त्यांना अशा पध्दतीने शासन करणार असाल, तर शेतकरी संघटनेचा त्याला नेहमीच विरोध राहिल, असा झणझणीत इशाराही शेट्टी यांनी दिला.रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही भाजप सरकारवर जोरदार तोफ डागली. भाजप सरकारला आम्ही शेतकरी हितासाठी साथ दिली. देशाचा कणा व्यवस्थित राहिला तर देश प्रगती करेल, हा आमचा हेतू होता. मात्र साथ आमची घेऊन सत्तेत आल्यानंतर बारामतीच्या वळचणीला जाऊन आमचे जबाबदार नेते सल्ले विचारत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्री आहे. या सरकारची कुवत काय आहे, हे आम्हांला चांगले माहीत आहे, असे म्हणत राजू शेट्टी यांना उद्देशून आता फक्त मोर्चा काढायचा नाही तर सरकारच बदलायचे आहे, असा इशाराही जानकर यांनी दिला.
सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद मिळाले नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. सत्ता आली की माणूस बदलतो. आपल्या लोकांना विसरतो. असे सांगत निवडणुकीच्या काळातला किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात जानकर हेलिकॉप्टर घेऊन फिरायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, तुमचे कॅबिनेट फिक्स आहे, आमच्याही कॅबिनेटची चर्चा झाली. मात्र सरकार आल्यावर आम्ही आमच्या केबिनमध्येच राहिले. खासदार शेट्टीही म्हणायचे, कृषीमंत्रीपद सोडू नकोस, असे करत करत पावणे दोन वर्षे गेली, तरी काय पद मिळाले नाही, असे म्हणत त्यांनी राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा नसतो, असे सांगितले.