भारताने मालिका 2-1 ने जिंकली; श्रीलंकेवर 9 विकेटने मात
विशाखापट्टणम, 15 - गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियाने मालिकेतील अखेरच्या टी-20 सामन्यांत श्रीलंकेला 9 विकेटने पराभूत करून दणकेबाज विजय मिळवला. भारताकडून आर. अश्विनने 8 धावांत 4 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी लंकेला 18 षटकांत 82 धावांत गुंडाळले. यानंतर भारताने 13.5 षटकांत 1 बाद 84 धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्माच्या रूपाने एकमेव विकेट गमावली.
13 चेंडूंत 1 षटकार, एका चौकाराच्या साह्याने 13 धावा काढणार्या रोहितला चामिराने पायचीत केले. यानंतर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. धवन-रहाणे यांनी दुसर्या विकेटसाठी 8.3 षटकांत नाबाद 55 धावांची भागीदारी करून विजय खेचून आणला. धवनने नाबाद 46 तर रहाणेने नाबाद 22 धावा काढल्या. धवनने 46 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 5 चौकार मारले, तर रहाणेने 24 चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. दोघांनी जोखीम न घेता भागीदारी केली. आता टीम इंडिया बांगलादेशात होणार्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत खेळेल. त्यानंतर 8 मार्चपासून भारतात वर्ल्डकप टी-20 स्पर्धेत सहभागी होईल.