Breaking News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर

नाशिक/प्रतिनिधी। 09 -  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता, पल्मोनरी मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. आरोग्य विद्यापीठाशी त्यांचा ऋणानुबंध राहिला आहे. अधिसभेचे ते सदस्य आहेत. 
राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी केली. डॉ. म्हैसेकर यांची कुलगुरुपदावरील नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. राज्यपालांनी कुलगुरू निवडीसाठी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रा. डॉ. निखिल टंडन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मेधा गाडगीळ सचिव होत्या. चंडीगडच्या पीजीआयएमईआरचे संचालक प्रा. वाय. के. चावला सदस्य होते. या समितीने शनिवारी (ता. 6) कुलगुरुपदासाठी अर्ज केलेल्यांपैकी अकरा जणांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून काही नावांची शिफारस राज्यपाल कार्यालयाकडे केली होती. 
समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती राजभवनात घेण्यात आल्या. दरम्यान, डॉ. अरुण जामकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ 20 डिसेंबर 2015 ला संपल्याने हे पद रिक्त होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपद सोपवण्यात आले आहे.  म्हैसेकर यांचा परिचय
डॉ. म्हैसेकर यांचा जन्म 12 जुलै 1960 ला झाला आहे. त्यांनी 1984 मध्ये औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली. 1989 मध्ये मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून क्षयरोग आणि श्‍वसन या विषयात एमडी ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. डॉ. म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय वैद्यक परिषदेच्या पदव्युत्तर पदवी विभागाचे ते सदस्य आहेत. श्री. डवले यांच्याकडून लवकरच ते कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारतील.