कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराचे वितरण 10 मार्च रोजी
नाशिक/प्रतिनिधी। 09 - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा ’गोदावरी गौरव’ पुरस्कार प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, प्रसिद्ध नृत्यांगना कनक रेळे यांना जाहीर झाला आहे. नाशिकचे महाजन बंधू, डॉ. शशिकुमार चित्रे, चेतना सिन्हा, डॉ. बाळकृष्ण दोशी यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी येत्या 10 मार्च रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.एकवीस हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत डॉ. प्रकाश आमटे, गंगूबाई हनगल, हृषिकेश मुखर्जी, रघुनाथ माशेलकर यांसारख्या 72 दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात पहिल्याच वर्षी लोकसेवेसाठी डॉ. प्रकाश आमटे, चित्रपटासाठी अभिनेते अशोक कुमार, क्रीडा क्षेत्रासाठी ज्येष्ठ क्रिकेटपटू विजय हजारे, संगीत क्षेत्रासाठी गंगूबाई हनगल तर, ज्ञान-विज्ञानासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. गीतकार गुलजार, हृषीकेश मुखर्जी, अभिनेत्री सुलोचना, बिरजू महाराज, पं. सत्यदेव दुबे, डॉ. प्रभा अत्रे, शाहीर साबळे, डॉ. मोहन आगाशे, डॉ. अनिल अवचट, बाबा आढाव, राजेंद्रसिंह, डॉ. भीमराव गस्ती, मृणाल गोरे, डॉ. इंदुमती पारीख, अण्णा हजारे, डॉ. जयंत नारळीकर, पॉली उम्रीगर, रोहिणी भाटे, आर. के. लक्ष्मण, सुधीर फडके, भक्ती बर्वे-इनामदार, किशोरी अमोणकर, राम सुतार, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, गौतम राजाध्यक्ष, राम गबाळे, विजया मेहता, राम ताकवले, प्रवीण टिपसे, सुहास बहुलकर, धनराज पिल्ले आदींचा समावेश आहे.