Breaking News

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला गोयलगंगा ग्रुपने मदतीचा हात

 पुणे (प्रतिनिधी)। 10 -  पाण्याचा थेंब नसल्यानं भेगा पडलेल्या जमिनीकडं बघत बसण्याशिवाय दुष्काळी भागातील शेतक-यांच्या हातात काहीच उरत नाही. त्यात आधीच शेतीसाठी, कुटुंब जगविण्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज, पोरांची तुटलेली शाळा आणि उघडा संसार अशी अवस्था असते. या परिस्थितीमुळे हताश झालेल्या  तरुण शेतकरी बालाजी नारायण मिटकरी (वय 30) यांनी गेल्याच महिन्यात आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या बघून हृदय विकाराने त्यांची पत्नी भाग्यश्री (वय 26) यांचाही मृत्यू झाला आणि सगळं कुटुंबच उघड्यावर आले.उस्माबादमधील कळंब तालुक्यातील कन्हेरवाडीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. वर्तमानपत्रात याबाबतची माहिती वाचनात आल्यावर गोयलगंगा ग्रुपचे अध्यक्ष जयप्रकाश गोयल आणि व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. पाच लाख रूपयांची तातडीची मदत देऊन त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. 
सहा महिने, दीड वर्षे आणि दोन वर्षाच्या चिमुकल्यांच्या आयुष्याचा प्रश्‍न उभा राहिल्याने त्यांच्या आजीआजोबांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन या इवल्याशा जिवांची जबाबदारी उचलली आहे. आजीआजोबांची साथ आहे तोपर्यंत प्रश्‍न मिटल्यासारखा वाटत असला तरी उजाड आयुष्याची ठिगळं निरागस मुलं कशी जोडतील, अशा मानवीय विचाराने गोयलगंगा ग्रुपने या तिन्ही मुलांची आणि त्यांच्या आजीआजोबांची जबाबदारी स्वीकारून माणुसकीचा झरा अजुनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. 
सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे कर्जासाठी बँकेकडे गहाण असलेली जमीन सोडवून या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधनही त्यांना परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपये एफडी करण्यात आली असून, बॅकेकडे गहाण असलेली शेती सोडवून मुलांच्या उदरनिर्वाहाचं साधनही त्यांना मिळवून देण्यासाठी दोन लाख रूपये दिले आहेत.
सर्वसामान्य माणसांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देणे ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. दुष्काळामुळे शेतीच पिकत नसल्यानं माणसं कशी जगत असतील, याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. आई-वडिलांचं छत्रच हरवल्यानं चिमुकली मुलं आणि त्यांचं कुटुंबच उघड्यावर आले आहे. या मदतीतून त्यांचा काही प्रमाणात प्रश्‍न सुटत असला तरी या मुलांचे आम्ही पालकत्त्व स्वीकारले असून त्यांच्यासोबत आम्ही कायम बरोबर राहणार आहोत. अशी भावना गोयलगंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी व्यक्त केली . 
तसेच, मुलगा आणि सून दोघेही गेल्यानं सगळा संसारच मोडून पडला आहे. भली माणसं आजही समाजात आहेत म्हणून उघड्यावर आलेल्या चिल्यापिल्यांना सांभाळायचं बळ मिळतं.  असे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आजोबा नारायण भैरू मिटकरी हे गहिवरून म्हणाले.