आयुक्तांनी शिक्षण मंडळ सभापती व उपसभापतींसोबत केली शाळांची पाहणी
पिंपरी (प्रतिनिधी)। 10 - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले व इतर सदस्यांनी अधिकार्यांसोबत दोन महिन्यांपूर्वी केलेल्या शाळा पाहणीत निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर झाल्या किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी (दि. 9) तीन शाळांची पाहणी केली. चिंचवड स्टेशन, निगडी ओटास्किम आणि काळभोरनगर येथील शाळांना भेटी देऊन आयुक्त जाधव यांनी माहिती घेतली.
तसेच काळभोरनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी वर्गही घेतला. मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले व इतर सदस्यांनी दोन महिन्यांपूर्वी महापालिका शाळांचा अचानक पाहणी दौरा करून शाळांची मैदाने, स्वच्छतागृहे, शाळा इमारती आणि परीसराची दयनीय अवस्था समोर आणली. तसेच त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकार्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला. परंतु, त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याने सभापती घुले यांनी महापालिका शाळांतील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंडळाचे सदस्य व अधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली. त्यानुसार आयुक्त जाधव यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत शाळांच्या इमारती, आतील फळे, स्वच्छतागृहे व मैदानांची झालेली दुरवस्था तसेच शाळांच्या परिसरातील अस्वच्छतेबाबत सभापती घुले व उपसभापती शिवले यांनी आयुक्तांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे आयुक्त जाधव यांनी मंडळाचे दोन सदस्य आणि संबंधित अधिकारी यांनी 7 ते 12 डिसेंबर या कालावधीत सर्व शाळांचा संयुक्त पाहणी दौरा करण्याचे आदेश दिले. तसेच या दौर्यात शाळांमध्ये आढळणार्या समस्या एक महिन्याच्या कालावधीत दूर करण्यास अधिकार्यांना सांगितले. त्यानुसार मंडळाचे सदस्य व अधिकार्यांनी सर्व शाळांची संयुक्त पाहणी केली. त्यामध्ये आढळलेल्या समस्या दूर झाल्या किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांनी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले यांच्यासह मंगळवारी पाहणी केली. चिंचवड स्टेशन, निगडी ओटास्किम आणि काळभोरनगर येथील शाळांना भेटी देऊन आयुक्त जाधव यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली. शिक्षण मंडळ आणि अधिकार्यांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या किरकोळ समस्या दूर करण्यात आल्याचे आणि मोठ्या समस्यांना अद्याप सुरूवात झाली नसल्याचे आयुक्त जाधव यांच्या निदर्शनास आले. निगडी, ओटास्किम येथील कै. मधुकर पवळे शाळेची सीमाभींत कोसळले असून, त्याचे काम अद्याप सुरू नसल्याचे आढळून आले. आयुक्त जाधव यांनी संबंधित अधिकार्यांना दूरध्वनी करून महापालिका शाळांमधील मोठी कामे करण्याच्या सूचना केल्या. तसेच काळभोरनगर येथील शाळेत दुसरीचा त्यांनी वर्गही घेतला. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. यासंदर्भात सभापती घुले व उपसभापती शिवले म्हणाले, महापालिका शाळांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने अनेक वर्ष लक्षच दिलेले नाही. त्यामुळे शाळांमध्ये अनेक किरकोळ समस्या आहेत. शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळेच मंडळामार्फत शाळांच्या पाहणीचा दौरा करण्यात आला. त्यामध्ये आढळलेल्या किरकोळ समस्या दूर करण्यात आल्या आहेत. परंतु, मोठी कामे अद्याप हाती घेण्यात आले नाहीत. आयुक्त राजीव जाधव यांनी तीन शाळांना भेटी देऊन समस्यांची माहिती घेतली आहे. त्यांना शाळांमधील नेमक्या समस्या समजल्या आहेत. त्यामुळे यापुढे या सर्व समस्या दूर होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.