ज्वेलर्स आज करणार एक दिवसाचा संप
पुणे, 10 - दोन लाख रुपये आणि त्यापुढील रकमेच्या दागिने खरेदीवर पॅन कार्ड सादर करणे सक्तीचे करण्याच्या सरकारच्या नियमाचा निषेध करण्यासाठी आज 10 फेब्रुवारी 2016 रोजी देशातील अंदाजे 300 ज्वेलरी ट्रेड संघटना आणि 1 लाख दुकानांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
दागिने खरेदी करणार्यांसाठीच्या या नियमामुळे अगोदरच व्यवसायाला फटका बसला आहे आणि देशभरातील ज्वेलरी क्षेत्रातील मंदीमुळे लाखो कामगार, कलाकार आणि लहान व्यापारी यांच्या रोजगारावर गदा आली आहे. कारण, महिनाभरापूर्वी हा नियम जाहीर केल्यापासून व्यवसायाची उलाढाल अंदाजे 30टक्के घटली आहे.
जीजेएफचे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधर म्हणाले, संपूर्ण उद्योगासासमोरच अस्तित्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे, लहान शहरे व ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्येकडे स्वतःच्या नावाचे पॅन कार्ड नसल्याने या भागांतील ग्राहक गमवावे लागत आहेत. गेल्या एका महिन्यात अंदाजे 30 टक्के नुकसान सोसावे लागल्याने आमचे सदस्य आणि अन्य अनेक ज्वेलर्स संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
ही परिस्थिती बराच काळ राहिल्यास अनेक कामगार, कारागीर व कर्मचारी यांच्या नोकर्या जातील. आम्ही अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात आहोत आणि त्यांना दोन लाख रुपयांच्या सध्याच्या अटीऐवजी 10 लाख रुपयांच्या खरेदीवर पॅनकार्ड सक्तीचे करण्याचे आवाहन करत आहोत.
संचालक अशोक मिनावाला म्हणाले, या क्षेत्रात कार्यरत असणारे लक्षावधी ज्वेलर्स आणि कारागीर यांच्यापुढे संकट निर्माण करणार्या या नियमाला माझा जोरदार विरोध आहे. सर्वोच्च संघटना म्हणून या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी व संबंधित अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी जीजेएफवर देशभरातील संघटनांकडून प्रचंड दबाव आहे. परंतु, यातून काहीही तोडगा निघत असल्याचे दिसत नसून सर्व संघटना एकत्रितपणे देशभर निषेध करण्याचे नियोजन करत आहेत. त्यांनी 10 फेब्रुवारी रोजी एका दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषणा केली आहे.
पॅन कार्डाच्या नियमामुळे बहुसंख्य निमशहरी व ग्रामीण दागिने ग्राहकांना दागिने खरेदी करण्यापासून परावृत्त केले जात आहे. हे ग्राहक एक तर शेती करतात (प्राप्तिकराचे बंधन नाही) किंवा लहान व्यापारी आहेत. भारतात केवळ 22.3 कोटी पॅन कार्ड जारी करण्यात आली असून इतक्या निर्बंधांमुळे हे क्षेत्र कसे अस्तित्वात राहील?
अलीकडच्या काळात, विविध संघटनांच्या अंतर्गत असलेल्या हजारो ज्वेलर्सनी 18 जानेवारीपासून भारतभरातील 60 शहरांत कँडल मोर्चा काढला.