कराडमधील पोंहायला गेलेला व्यापारी वाहून गेल्याची भीती
कराड, 14 - येथील रविवार पेठेतील धान्याचे व्यापारी व हिंदू एकता आंदोलनचे शहर सचिव कृष्णात नामदेव पवार (वय 45) हे येथील कृष्णा नदीच्या पात्रातून बेपत्ता झाले. नदी पात्रातून ते वाहून गेल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कृष्णात पवार यांचे कराड येथील भाजी मंडईत घाऊक दुकान आहे. धान्याचे व्यापारी म्हणून ते परिचित आहेत. येथील कृष्णा व कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर ते पोहण्यासाठी गेले होते. सकाळच्यावेळी धुके असताना पोहण्यासाठी ते नदीच्या प्रवाहात गेले. त्यावेळी आजूबाजूला पोहणारे लोक असतानाही ते बेपत्ता झाले. धुके असल्याने ते कोणालाच दिसले नाहीत. पवार यांच्या निकटवर्तीयांसह मित्र व रविवार पेठेतील लोकांनी नदीकाठी धाव घेतली. सुरवातीला अंदाज घेऊन त्यांचा शोध घेण्यात आला. त्यात यश न आल्याने पट्टीचे पोहणारे व नियमित नदीत मासेमारी करणार्या लोकांना बोलविण्यात आले. त्यांनी शोध कार्यात मदत केली मात्र, त्याला यश आले नाही. दरम्यान, प्रांताधिकारी किशोर पवार व तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी प्रीतिसंगमावर भेट देऊन मदतकार्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर दिवसभर पट्टीचे पोहणार्यासंह बोट पाण्यात सोडून सर्वत्र शोधण्यात आले. सायंकाळी पाणबुड्यांच्या माध्यमातून पात्रात शोध घेण्यात आला. मात्र, त्यासही
अपयश आले. त्यानंतर पवार बेपत्ता झाल्याची नोंद कराड पोलीस ठाण्यात झाली आहे.