प्रतापसिंहनगरमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 16 जण ताब्यात
सातारा, 14 - शहर पोलिसांनी येथील प्रतापसिंहनगरमधील कॅनॉल परिसरात जुगार अड्ड्यावर अचानकपणे छापा टाकून निलेश भांडे, विलास खंडागळे, विलास वानखेडे, सुभाष गायकवाड, अभिमान ओव्हाळ, शिवाजी खुडे, युवराज जाधव, अनंत गावंड, अजय जाधव, भाऊराव वाघमारे, पोपट पिसे, तानाजी उदागे, आप्पासाहेब डोंगरे, दिलावर मुलाणी, सुभाष गदगडे आदी 16 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलिसांनी दुचाकी, मोबाईल व रोकड असा ऐवजही जप्त केला.
छाप्यावेळी पोलिसांना मंदिर परिसर व घरामध्ये काहीजण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अचानक कारवाईला सुरुवात केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधितांची धरपकड करुन पोलीस ठाण्यात आणले. कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे 4 ते 5 दुचाकी, 4 ते 5 मोबाईल व रोकड असा ऐवजही जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे, फौजदार अस्वर, प्रज्ञा देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी कारवाईमध्ये भाग घेतला होता.