देशाची पिढी घडवण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे ः तावडे
चिंचवड (प्रतिनिधी)। 09 - देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान खूप महत्वाचे आहे. ज्ञानदानाच्या प्रक्रियेतला शिक्षक हा महत्वाचा दुवा असून उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ प्रशिक्षक व व्याख्याते उज्ज्वल तावडे यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात यशस्वी ग्रुपच्या वतीने आयोजित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील प्रशिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेत औरंगाबाद, फुलंब्री, जालना, हिंगोली, परभणी, वाशीम, बुलढाणा आदी जिल्ह्यातून आलेले राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्किल इंडिया उपक्रमांतर्गत हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे.
तावडे पुढे म्हणाले की, प्रत्येक शिक्षकाने सकारात्मक मानसिकता अंगीकारावी तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वतः शिक्षकांनी स्वयंप्रेरित असणे आवश्यक आहे. यावेळी व्याख्यानांत त्यांनी वेगवेगळ्या चित्रफिती दाखवून ज्ञानदानाचे काम आणखीन उत्साही कसे असले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत यशस्वी अॅकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीचे संचालक प्रदीप तुपे, यशस्वी ग्रुपचे सल्लागार जे. के. सहस्त्रबुद्धे यांनीही शिक्षकांना आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक यशस्वी अॅकेडमी फॉर स्किल्सचे संचालक मल्हार करवंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद शाळीग्राम यांनी केले. या कार्यक्रमासाठी यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे ग्रंथपाल पवन शर्मा, श्रीकांत तिकोने आदींनी संयोजन केले.