Breaking News

दलितअल्पवयीन मुलीवर चौघा नराधमांचा अत्याचार

 श्रीगोंदा । प्रतिनिधी । 02 -  मुलीवर 4 नराधमांनी  विविध ठिकाणी नेऊन आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेबाबत पोलिसांनी तपास करण्याच्या नावाखाली पिडीत मुलीस व तिच्या काकास मारहाण केल्याचा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सामुहिक अत्याचार,  अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून दलित संघटनांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. 
 सविस्तर माहिती अशी,  तालुक्यातील तांदळी दुमाला  परिसरातील दलित समाजातील एका 16 वर्षाच्या मुलीस त्याच गावातील राहणारे दादा कन्हेरे याने सदर पिडीत मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मोटारसायकल वर बसवून तांदळी वरून कर्जत मार्गे  करमाळा (जिल्हा सोलापूर ) या ठिकाणी नेले. सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी दादा कन्हेरे याने अत्याचार केला व सकाळी दादा कन्हेरे याने त्याचे मित्र मिथुन धालवडे, गणेश बुणगे, संगम लांबडे यांना  करमाळा  येथे बोलावून घेतले व सर्वजण मिळून बारामती (जिल्हा पुणे  ) या ठिकाणी मित्राच्या खोलीवर तिच्यासह गेले. सदर ठिकाणी पुन्हा दादा कन्हेरे व मिथुन धालवडे यांनी आळीपाळीने अत्याचार  केला व गणेश बुणगे आणि संगम लांबडे हे त्यांना सहकार्य करत होते बारामती या ठिकाणी दोन दिवस मुक्काम करून जेजुरी या ठिकाणी आले  मात्र या प्रकरणाबाबत गावासह संपूर्ण तालुक्यात नातेवाईक यांच्याकडे मुलीचा शोध चालू आहे आणि पोलिस आपल्याला शोधत आहेत  हे लक्षात येताच आरोपींनी दि. 31 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी अजनुज या ठिकाणी राहणार्‍या पिडीताच्या काकाच्या घरी तिला  सोडून दिले आणि आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले मुलगी अजनुज या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिस त्या ठिकाणी जावून पिडीत मुलीस व तिच्या काकाची कसून चौकशी करत असतानाच  पोलिसांनी पिडीत मुलीस व तिच्या काकाला मारहाण केल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. पिडीत मुलीस पोलिस ठाण्यात घेवून आले असता, तांदळी दुमालासह तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी हजेरी लावून गुन्हा दाखल  करू नये यासाठी पिडीत मुलीच्या नातेवाईक यांच्यावर दबावतंत्र निर्माण करत असल्याची माहिती नातेवाईक यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती  पत्रकारांना देण्यास    श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील कर्मचारी व  पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी हे जाणून बुजून  टाळाटाळ करत होते, त्यामुळे सदर प्रकरणात पोलिस निरीक्षक यांचा नेमका हेतू काय होता हे मात्र समजू शकले नाही. याच प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. 
 दरम्यान,  पीड़ित मुलगी व   तिच्या काकाला पोलिसांकडून मारहाण   करुन तिच्या  काकास पोलिसांनी रात्रभर जेलची हवा दिली. सकाळच्या वेळी तालुक्यातील दलित कार्यकर्ते पोलिस स्टेशन मध्ये जमा होवून पोलिसांना जाब विचारला असता पोलिसांनी काकाला सोडून दिले.
आरोपींमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. गुन्हा दाखल होऊ नये व आरोपीना अभय मिळावे यासाठी तालुक्यातील काही नेत्यांनी नेहमीप्रमाणे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली. तालुक्यातील दलित कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या विरुध्द रोष व्यक्त करुन आक्रमक भुमिका घेतल्याने पोलिसांनी शेवटी नमते घेतले. गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून अत्याचाराच्या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्याऐवजी अत्याचार होणार्‍या कुटूंबालाच त्रास देण्याची भुमिका बजावत असल्याचे गेल्या अनेक घटनांवरुन दिसून आले. श्रीगोंदा तालुक्यातील विशेषत: पोलिस निरीक्षक हे नेहमीच चुकीची भुमिका घेऊन वादग्रस्त ठरत आहेत. त्यांच्यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप दलित संघटनांकडून केला जात आहे.