Breaking News

पोलीस भरतीच्या जागा वाढविण्यासाठी स्वाभिमानीचा मोर्चा

  बुलडाणा   । 14 - पोलीस दलातील शिपाई पदाच्या जागा वाढवून मिळाव्या यासाठी आज दि. 13 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राणा चंदन यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वाभिमानीच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने पोलिस दलाच्या शिपाई पदाच्या जागा काढल्या आहेत. यामध्ये सर्वात कमी जागा बुलडाणा जिल्ह्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्हा हा मागासजिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणूनही बुलडाणा जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये 4014 जागा शासनाने काढल्या आहेत. त्या पैकी फक्त 18 जागा जिल्ह्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. हा एक प्रकारे बुलडाणा जिल्ह्यावर केलेला अन्याय आहे. त्याच बरोबर विदर्भासाठी सुध्दा कमी जागा ठेवण्यात आल्या आहेत. 
योगायोगाने मुख्यमंत्री हे विदर्भातील आहेत. आणि गृहखाते त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे अशी जिल्ह्यातील युवक वर्गाची मागणी आहे. या संदर्भात आज स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच पोलीस भरतीमध्ये धावण्याचे अंतराचे वेळ वाढवावे, पोलीस भरतीच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 25 ऐवजी 28 करण्यात यावे. शिपाई पदाच्या जागा वाढवाव्यात, सुशिक्षीत बेरोजगारांना पेंशन लागू करावी आदि मागण्या राणा चंद्रशेखर चंदन यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या. यावेळी नितिन राजपूत, विनायक सरनाईक, महेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, शे.रफीक, कडूबा मोरे, निलेश राजपूत, भरत फोलाने, सदानंद पाटील, रमेश देशमुख, रमेश शिरसाठ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.