‘ट्राय’च्या निर्णयामुळे मार्क झकरबर्ग नाराज
वॉशिंग्टन, 10 - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात ‘फेसबुक’चा सीईओ मार्क झकरबर्ग याने नाराजी व्यक्त केली असून ट्रायने इंटरनेट वापरासाठीच्या दरांमध्ये फरक नसावा, असे स्पष्ट करत ‘फ्री बेसिक्स’च्या नावाखाली इंटरनेट समानतेच्या तत्त्वाला धक्का देणार्या फेसबुकच्या मनसुब्यांना लगाम घातला आहे. त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली.
मी ट्रायच्या या निर्णयामुळे नाराज झालो असलो, तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी आपण पुढील काळातही कार्यरत राहू, असे मार्कने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत आणि जगातील इतर देशांमध्येही जास्तीत जास्त लोकांना इंटरनेटच्या परिघात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फ्री बेसिक्सच्या माध्यमातून आम्ही विविध सेवा देण्याचा प्रयत्न करणार होतो. जोपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न विविध मार्गांनी चालूच राहतील, असेही त्याने स्पष्ट केले.