‘कोट्यवधी रुपयांच्या चिक्की घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा : हायकोर्ट
मुंबई, 10 - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसह भाजप सरकारला अडचणीत आणणार्या ‘कोट्यवधी रुपयांच्या चिक्की घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, किंवा या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमा.’ अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी अल्पावधीत कोट्यवधी रुपयांची चिक्की खरेदी केली होती. ती चिक्की विक्री नियमबाह्य असल्याचा आरोप होतो आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सीबीआयऐवजी चिक्की घोटाळ्याचा तपास निवृत्त न्यायधीश किंवा स्वतंत्र अधिकार्याकडे सोपवण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की ही निकृष्ट असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात तब्बल 206 कोटींची खरेदी केल्याचे समोर आले. चिक्की, चटई, डिशेस, पुस्तके अशा साहित्याची ही खरेदी आहे. त्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी एका दिवसात 24 आदेश काढले गेले. त्यामुळे ही घाई नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित झाला. शिवाय अशा प्रकारच्या खरेदीत सरकारी नियमांचा भंगही झाला आहे. कारण 3 लाखांच्या वरची खरेदी असेल तर त्यासाठी ई-टेंडर काढावेत असा निर्देश आहे. मात्र पंकजा यांनी या नियमाचे देखील उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.