बुलडाणा येथे किशोर बळींची हास्यमैफल संपन्न
बुलडाणा । 15 - विनोद हा अंत:करणाला हात घालून समाजाकडे बघण्याची एक निरागस नजर बहाल करीत असतो. छोट्या-छोट्या विसंगतीतून विनोद निर्माण होतो, जीवनाच्या खडतर प्रसंगात खिलाडूवृत्ती दाखवून जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न विनोदामुळेच होत असतो असे भावपूर्ण उद्गार हास्यकवी किशोर बळी यांनी काढले.
काल प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पुस्तकमैत्री बालवाचनालय आणि स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हास्यबळी डॉट कॉम या किशोरबळी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विचारपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, स्वरसाधना संगीत विद्यालयाचे अरविंद टाकळकर, पुस्तकमैत्रीचे नरेंद्र लांजेवार, अरविंद शिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी हास्यबळी डॉट कॉम कार्यक्रम सादर करतांना अनेक विनोद किस्से सांगून किशोर बळी म्हणाले की, आयुष्याच्या कठीण प्रसंगी विनोदाचीसाथ मिळाल्यास जीवन सुसह्य होऊन आनंदाने जगता येते. त्यामुळे रोजच्या जीवनामध्ये हास्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, यावर त्यांनी भर दिला. याप्रसंगी त्यांनी ‘असं कसं सांगू तुले गं सावित्रीबाई फुले, झाला पोराचा जलम पेठे वाटले थाटात, अशा कित्येक सावित्र्या आम्ही मारल्या पोटात...’ अशा सामाजिक आशयाच्या त्यांच्या काही कविता व गजलसुद्धा सादर केल्यात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण टाकळकर यांनी तर कवी किशोर बळी यांचा परिचय अरविंद शिंगाडे ह्यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार नरेंद्र लांजेवार यांनी मानले. त. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने शायर डॉ. गणेश गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे, प्रा.डॉ.सुहास उगले, डॉ.हर्षानंद खोब्रागडे, प्रा.डॉ.अनंत सिरसाट, श्रीमती कुंदाताई मर्ढेकर, प्रा.सुरेंद्र सेजे, प्रा.ई.जी.धांडे, सुभाष किन्होळकर, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वंदना टाकळकर, सौ. अंजली नेटके-कुळकर्णी, शिवप्रसाद राजोरीया, एन.एच.पठाण सर, प्रदीप हिवाळे, शिवशंकर गोरे, पंजाबराव गायकवाड, अंजली परांजपे, सौ. किरण टाकळकर, अर्जुन सातपुते, सौ. प्रज्ञा लांजेवार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी-पालक-शिक्षक उपस्थित होते.