Breaking News

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 38 कोटी रूपयांचा निधी मंजूर- पालकमंत्री

  बुलडाणा   । 15 - जिल्ह्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी, रस्ते बांधणीचा धड कार्यक्रम हाती घेण्यासाठी तसेच नादुरूस्त रस्ते, रस्ता नसलेल्या गावांना रस्ता निर्माण करण्यासाठी 38 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून रस्त्यांचा विकास या निधीच्या उपयोगामधून करण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांसाठी 27 कोटी आणि जिल्हा परिषदेला ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी 11 कोटी रूपयांच्या निधीचा समावेश आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज दिली. 
मलकापूर येथील विश्राम गृह येथे विविध यंत्रणांच्या आढाव्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, कार्यकारी अभियंता श्री. थोटांगे, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत वानखेडे, तहसीलदार श्री. जोगी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
   मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी रस्ता विकासासाठी साडे सात कोटी रूपये मंजूर केल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, मलकापूर विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निधी देण्यात आला आहे. या माध्यमातून रस्स्त्यांचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील 500 लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले एकही गाव डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक गावाला डांबरीकरणासह बारमाही रस्ता देण्यात येईल. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते दुरूस्तीसाठीही निधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक समाजाच्या  विकासाकरिता पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 
  मलकापूर नगर पालिकेला नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजना व दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून साडे तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगत पालकमंत्री खडसे म्हणाले, या निधीच्या माध्यमातून शहरातील विकास कामे होणार आहे. मलकापूर ग्रामीण या नवनिर्मित ग्रामपंचायतीसाठी रस्ते, गटारी निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून दीड कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. नांदूरा, खामगाव व मलकापूर शहरातील संवेदनशील भागात सुरक्षेच्या  दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यासाठी पुढील चार वर्षात 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 30 लक्ष रूपये देण्यात येणार आहे. हायमास्क दिव्यांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. मोठ्या गावांमध्ये किमान दोन तरी हायमास्क दिवे लावणार असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले. बैठकीला  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.