युवतीस पळविण्यास मदत केल्याच्या संशयावरून एक अटकेत
जालना, 15 - शहरातील एका युवतीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात जाकीर हुसेन विरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, युवतीस पळविण्यास मदत केल्याच्या संशयावरून शनिवारी पोलिसांनी एकास अटक केली आहे. फारूख सुभान हवारी (21 रा. मोदीखाना) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 16 फेबु्रवारी पर्यंत पोलिस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आल्याचे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितल.
शहरातील संभाजीनगर भागातील एका 21 वर्षीय युवतीस 5 फेबु्रवारी रोजी शहरातील तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी जाकीर हुसेन मंहमद इद्रीस (40) याच्याविरूद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेवरुन शहरात वातावरण तापले होते. तसेच व्यापारी, उद्योजक, राजकीय नेत्यांनी संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करीत याबाबतचे निवेदन दिले होते. परिणामी पोलिसांवर तपासासाठी दबाव वाढला होता. त्यामुळे कारवाईसाठी वेगवेगळ्या राज्यांत तीन पथके त्यांच्या शोधासाठी पाठविण्यात आलेले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत दोघांचाही शोध लागलेला नाही.